मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील रविवारी राहुरीत
राहुरी – मराठा आरक्षणासाठी तब्बल १६ दिवस उपोषण करून सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे हे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. आपली भूमिका स्पष्ट करत पुढील आंदोलनाची ध्येयधोरणे ठरवत आहेत. त्यांची रविवार, दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठला लॉन्स राहुरी येथे जाहीर सभा होत असल्याची माहिती मराठा एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठी तब्बल १६ दिवस आमरण उपोषण केले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते व ४० दिवसांत जर सरकारने आरक्षणसंदर्भात ठोस पावले उचलली नाहीत तर पुन्हा मोठा लढ़ा उभारण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता. सध्या राज्यातील विविध भागात ते सभा व गाठीभेटी घेत आहेत.
राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा राहुरी येथे घेण्याचा एकमुखी निर्णय मराठा सदस्यांकडून घेण्यात आला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे राहुरी येथे रविवार दि. ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता आगमन होणार आहे.
या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात राहुरीच्या पुण्यनगरीत स्वागत करण्यात येणार आहे. राहुरी परिसरात विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागत बोर्ड लावण्यात येणार आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज पुन्हा एकत्र येत आहे. याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. राहुरी येथील कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.