कृषी

पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पौष्टिक तृणधान्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार होण्यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व लागवड या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ.सी. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीमंत रणपिसे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, विभागीय व जिल्हा विस्तार केंद्रांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, प्राध्यापक व शास्त्रज्ञ ऑनलाईन उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्गदर्शन करताना डॉ. सी. एस. पाटील म्हणाले की पौष्टिक तृणधान्याचा समावेश आपल्या आहारात जास्तीत जास्त करायला हवा. त्यामध्ये असणार्या उच्च प्रतीच्या पोषणमूल्यांमुळे आपले आरोग्य चांगले राहते. विविध आजारांपासून आपले संरक्षण होण्याकरिता आपल्या रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी तसेच नाचणी या महत्त्वाच्या तृणधान्यांचा समावेश सर्वांनी करणे गरजेचे आहे.

यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दिपक दुधाडे यांनी अधिक उत्पादनासाठी ज्वारी पिकाबाबत पंचसूत्री लागवड तंत्रज्ञान, वरिष्ठ अन्न तंत्रज्ञ डॉ. उदय दळवी यांनी ज्वारी पिकाचे पौष्टिक गुणधर्म, आहारातील महत्त्व व मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती, बाजरी पैदासकार डॉ.के.बी. बराटे यांनी बाजरी पिकाचे सुधारित वाण व पौष्टिक गुणधर्म, नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन यांनी नाचणी व इतर तत्सम तृणधान्य पिके, त्यांची ओळख, पौष्टिक गुणधर्म, सुधारित वाण व लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले.

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. अमर लोखंडे यांनी तृणधान्य पिकांचे चार्यासाठी महत्त्व आणि त्याची गुणवत्ता वाढ यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ.पंडित खर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसारण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार डॉ. बाबासाहेब भिंगारदे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button