धार्मिक

जीवनात आत्मसमर्पण, प्रिती, प्रार्थना, प्रेषितीय कार्य, त्याग ह्या गोष्टी आवश्यक -फा. विशाल त्रिभुवन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव मतमाउली भक्तिस्थानात मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचे चौथे पुष्प गुंफताना फा. विशाल त्रिभुवन यांनी “पवित्र मारिया ख्रिस्ताची परिपूर्ण शिष्या” या विषयावर प्रतिपादन केले की, शिष्या म्हणजे काय, जो गुरूच्या अतिशय जवळ राहतो आणि पवित्र मारिया ही जरी प्रभू येशू ख्रिस्ताची आई असली तरी तिने देखील प्रभू येशूचे शिष्य ज्या प्रमाणे अनुसरतो त्या प्रमाणे ती प्रभू येशूला अनुसरली. प्रभू येशूच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत म्हणजेच पवित्र मरिया त्याचजवळ राहिली.

पवित्र मारिया ही जणू काही प्रभू येशूबरोबर सावलीप्रमाणे राहिली. त्यामुळे तिचे संपूर्ण जीवन पवित्र झाले. प्रभू येशू ख्रिस्ताने नऊ महिने तिच्या उदारमध्ये काढले. त्यानंतर जवळ जवळ ३० वर्षे प्रभू येशू तिच्या बरोबर राहिला. म्हणूनच तिला प्रभू येशूचा सहवास लाभला आणि त्यामुळे तिने सर्व चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे कि जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्याने प्रथम तीन गोष्टीची पूर्तता केली पाहिजे. त्याने स्वत:ला नाकारले पाहिजे, दुसरो गोष्ट त्याने स्वत:चा क्रूस उचलला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट त्याने प्रभूला अनुसरले पाहिजे. पवित्र मारिया या तिन्ही गोष्टीची पूर्तता करते. अशा प्रकारे पवित्र मारीयेचे जे गुण आहेत ते फार महत्वाचे आहेत.

शिष्यात ५ गुण महत्वाचे असतात. पहिला गुण आहे तो म्हणजे पूर्ण आत्मसमर्पण करणे, दुसरा जो गुण आहे तो म्हणजे प्रीती, गुरुवर अतोनात प्रीती पाहिजे तरच तो चांगला शिष्य बनतो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रार्थना, जो शिष्य प्रार्थना करतो तोच गुरूच्या सानिध्यात राहतो, आणि गुरुकडून चांगले ते शिकतो. चौथी गोष्ट आहे प्रेषितीय कार्य, सुवार्ता सांगणे, जो पर्यंत आपण चांगले कार्य करीत नाही प्रभू येशुकडून भरपूर काही शिकलो पण ते जर इतरांना सांगितले नाही, आपण लोकांची सेवा केली नाही तर आपण त्यापासून काही फायदा घेऊ शकत नाही. पाचवी गोष्ट आहे त्याग जे शिष्य आहेत त्यांनी भरपूर त्याग करावा, पवित्र मारीयेने आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींचा त्याग केला. तिने आपले क्रौमार्याचा त्याग केला, तिने आपल्या जीवनाचा, वेळेचा, त्याग केला. तिने आवड निवड यांचा त्याग केला. केवळ आपल्या गुरुसाठी देवासाठी ते म्हणजे येशू ख्रिस्तासाठी.

या नोव्हेनात हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड, संजय पंडित आदी सहभागी होते. दि ४ सप्टेंबर रोजी पुणे येथील फा. भाऊसाहेब संसारे यांचे पवित्र मारिया नितीमत्वासाठी छळ शान करणाऱ्यांची सहाय्यकारिणी या विषयावर प्रवचन होईल. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक यांनी केले आहे. त्याच प्रमाणे अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा नियोजनाप्रमाणे उत्साहात पार पडणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. दि ८ सप्टेंबर पर्यंत रोज नोव्हेना व मुख्य यात्रा ९ सप्टेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे, असेही फा. डॉमनिक यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button