अहमदनगर

उजवा कालव्याला त्वरीत पाणी सोडा- सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : मुळा धरण उजव्या कालव्यातून शेती पिकांसाठी त्वरित पाणी आवर्तन सोडण्याची शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने उलटुनही नगर जिल्ह्यासह मुळा धरण लाभक्षेत्रात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाउस न झाल्यामुळे खरीप हंगामातील अनेक शेतक-यांना कपाशी, सोयाबीन, बाजरी व ईतर पिकांची पेरणी करता आलेली नाही, तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने त्या भागात पेरणी झाली. परंतु त्यानंतर पाऊस न पडल्याने पिके जळुन चालली आहे.

आज रोजी मुळा धरणात 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठा उपलब्ध असुन अजुनही नवीन पाण्याची आवक सुरु आहे. अजुनही दिड महिना पावसाळा हंगाम शिल्लक असुन मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होऊन धरण पुर्ण क्षमतेने भरु शकते. परंतु आज रोजी शेतक-यांनी पेरणी केलेल्या पिकांसाठी उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास जिवदान मिळेल.

तरी आठ दिवसांपासुन मुळा डाव्या कालव्याला पाणी सोडुन त्या भागातील शेतक-यांना सहकार्य केले, त्याप्रमाणे मुळा उजवा कॅनलला पाणी सोडुन या लाभक्षेत्रातील शेतक-यांचे पाऊस न झाल्यामुळे जळुन चाललेल्या पिकांना जिवदान द्यावे. शासन व प्रशासन यांनी या ज्वलंत मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा व त्वरित उजवा कालव्याला शेती आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती वेनुनाथ पाटील कोतकर, मधुकर गांधले, पिंपरी अवघडचे माजी सरपंच अंतवन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भारत जगधने व इतर शेतकरी उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा उपमुख्यमंत्री, अहमदनगर पालकमंत्री तथा महसूलमंत्री, अहमदनगर जिल्हाधिकारी, अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button