ठळक बातम्या

आई वडीलांना समाजात मान खाली घालायला लावू नका; पो.नि. जाधव यांची विद्यार्थींना आर्त हाक

राहुरी | अशोक मंडलिक : विद्यार्थी दशेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन, सोशल मीडिया वेबसाईट पासून दूर राहावे. आपले शिक्षण, करियर यावर लक्ष देऊन जीवन यशस्वी करावे, असे आवाहन राहुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धंनजय जाधव यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे, निघून जाण्याचे प्रमाण वाढल्याने व त्यामुळे साहजिकच लैंगिक अत्याचार आणि पोक्सो सारख्या घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शालेय विध्यार्थांशी सवांद साधून त्यांना सूचना देण्यासाठी देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील विद्यार्थी व विद्यार्थीनींशी जाधव यांनी संवाद साधला. प्रा. पोपट कडूस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, शिक्षक, पोलीस कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोनि जाधव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःचा इत्यंभूत जीवन प्रवास उलगडून सांगितला. जिद्द, चिकाटी व शिस्त ज्याचेकडे असेल तो विद्यार्थी कितीही प्रतिकूल परस्थितीवर मात करतो व जीवनात यशस्वी होतो. हे सांगतानांच या देशातील कायदे हे आपण बनवले. त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. पोलीसांविषयी मनात भीती बाळगू नये. पोलीस हा कायद्याची अंमलबजावणी करून देशातील नागरिकांच्या मालमता व जीविताचे रक्षण करतो.

विद्यार्थी मित्रांनी मोबाईलच्या फसव्या दुनिये पासून स्वतःला दूर ठेवावे, देशाचे सर्व राष्ट्र पुरुष आपला आदर्श आहेत, त्यांचे विचारांवर आपण चालतो, त्यांचे योगदान विसरू नका. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र पुरुषांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई केली जाते. अनोळखी लोकांशी मैत्री करणे टाळावे, आपली आई-वडील, आपला भाऊ बहीण यापेक्षा चांगला मित्र कुणी नसतो. जे आई वडील जीवापाड प्रेम करून आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतात, त्यांना अपमानित करू नका. त्यांना समाजात मान खाली घालवी लागेल असे कृत्य करू नका. विशेषतः मुलींनी याबाबत अत्यंत सावध राहावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

प्राचार्य पोपट कडूस यांनी सर्व स्टाफ व विद्यार्थी यांचे वतीने आपण दिलेल्या सूचनाचे पालन करू व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली. विद्यालयाचे वतीने पोनि धंनजय जाधव व पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थीनीस ञास द्याल तर…

कोणत्याही विद्यार्थिनीला कुणी त्रास देत असेल तर त्यांनी शाळेतील तक्रार पेटीत आपली तक्रार टाकावी अथवा माझ्या मोबाईलवर थेट संपर्क साधवा. गैरवर्तन करणाऱ्या टार्गटाची गय केली जाणार नाही, असा विश्वास पोलिस निरीक्षक जाधव यांनी विद्यार्थिनींना दिला. विद्यार्थिनींनी याचे जोरदार टाळ्या वाजवत समर्थन केले.

यावेळी साहाय्यक फौजदार आहेर, पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे, जालिंदर साखरे, उप प्राचार्य आल्हाट, पर्यवेक्षक काळे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.गणेश भांड यांनी सूत्रसंचलन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button