महाराष्ट्र

समाजसेवकांचे कार्य सौंदर्यापेक्षाही सुंदर-चित्रपट निर्माते विजय पाटकर

महाराष्ट्र समता गौरव पुरस्काराने दादासाहेब पवार सन्मानित

राहुरी : माणूस कितीही सुंदर असला तरी त्याचे सौंदर्य नष्ट होते. पण समाजसेवकांचे समाजाप्रती, देशाप्रती असलेले कार्य हे चिरकाल टिकते आणि म्हणूनच मानवी सौंदर्यापेक्षा समाजसेवकांचे सेवा कार्य सुंदर असते, असे विचार चित्रपट निर्माते विजय पाटकर यांनी व्यक्त केले आहे.

परभणी येथे दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी क्रांती दिनाच्या पर्वावर जनहित फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा “महाराष्ट्र समता गौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन व अभिनंदन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट चित्रपट निर्माते मार्गदर्शक विजय पाटकर तर उद्घाटक म्हणून पुणे येथील किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री श्री १००८ दीपाताई मम्मी उपस्थित होत्या.

याप्रसंगी जनहित फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले, डॉ. पंढरीनाथ शेळके, दादासाहेब पवार, प्रा. गौतम सर, डॉ. सुनील जाधव यांच्यासह अन्य समाजसेवकांची सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आयोजक प्रदीप फाले यांनी सर्वांचे स्वागत केले आणि समाजसेवक हा जनहिताचे काम करीत असतो. अनेक अडीअडचणींवर मात करून सेवा कार्य पुढे नेत असतो. त्यांचं कौतुक करणं हे एक समाजाची जबाबदारी असते आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती दिली.

यावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी निळवंडेसाठी गेले पंधरा वर्षापासून सततचा केलेला पाठपुरावा, महाराष्ट्रात गुटखा बंदीसाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुरावा, त्यातून काही साध्य न झाल्याने नाईलाजाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली व सध्या कोर्टाने निर्णयासाठी ठेवले आहे. त्याचबरोबर राज्यात होणारी दूध भेसळ त्यासाठीही न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच अनेक संस्थांचे भ्रष्टाचार बाहेर काढून त्यावर त्यांना शासनाला कोट्यावधी रुपये भरण्यास भाग पाडले आहे. अनेक भ्रष्टाचाराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. त्या सर्व याचिका लवकरात लवकर निकाली लागून सर्वसामान्यांच्या दृष्टीने हितकारक ठरणारे असल्याने दादासाहेब पवार यांना “महाराष्ट्र समता गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पुरस्कार हा सेवा कार्य करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतो म्हणून आपण दिलेल्या पुरस्कारामुळे आम्हा सर्वांना आणखी सेवा कार्य करण्याचं बळ मिळेल आणि समाजाच्या उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी आम्ही पुढे वाटचाल करू असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले तर सर्वांचे आभार आयोजक प्रदीप फाले यांनी मानून सत्कार सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे समाजसेवक मोठ्या संख्येने गौरव सोहळ्यास उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button