जुनी पेन्शनसाठी भव्य मोटार सायकल रॅली
राहुरी विद्यापीठ : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनानुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांकरीता दि. 14 मार्च, 2023 ते 20 मार्च, 2023 या कालावधीत विद्यापीठातील अधिकारी/कर्मचार्यांनी संप पुकारला होता.
या संपाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागु करण्यासंदर्भात अभ्यास समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभ्यास समितीस दि. 14 ऑगस्ट, 2023 नंतर पुन्हा मुदतवाढ न देता पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करावी या मुख्य मागणीसंदर्भात शासनाचे लक्ष वेधन्याकरीता महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, मफुकृवि, राहुरी यांचे वतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांनी मध्यवर्ती परिसर, मफुकृवि, राहुरी येथे मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
या अनुषंगाने ही रॅली मध्यवर्ती परिसरातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, पदव्युत्तर महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा, दुकानलाईन व महिला जिमखानामार्गे प्रशासकीय इमारतीजवळ येवून जुनी पेन्शन योजना लागु करणे व इतर मागण्यांसंदर्भातील निवेदन कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांना दिले.
कृषि विद्यापीठातील डी.सी.पी.एस./एन.पी.एस. धारक अधिकारी/कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी काढण्यात आलेल्या या भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये 250 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचारी समन्वय संघाचे सचिव देविदास घाडगे, कार्याध्यक्ष कर्मचारी समन्वय संघ दत्तात्रय कदम, गोरक्षनाथ शेटे, सदस्य महेश घाडगे, पांडुरंग कुसळकर, संदिप लवांडे, डॉ. प्रकाश मोरे, श्रीमती शैला पटेकर, वैशाली मते, मनिषा दहातोंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.