देहरे ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीकन्याचे स्वागत
राहुरी : देहरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले. या कृषीकन्या ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आल्या असून, गावातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या पुजा सूर्यभान लांबे, मोहिते शुभदा आण्णा, तांबे भैरवी भानुदास, सूर्यवंशी मैथिली दत्तात्रय, लष्करे प्रथमेशवरी संतोष या येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कृषीकन्या पुढील दहा आठवड्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे अनुभव जाणुन गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती बीजप्रक्रिया, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. या उपक्रमातून आधुनिक शेतीला नवी दिशा मिळेल तसेच, वेळोवेळी विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत, अशी ग्वाही देहरे गावातील ग्रामस्थांना कृषीकन्यांनी दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.बी. राऊत, प्रा. डॉ.एच.एल शिरसाठ, प्रा. ठोंबरे मॅडम, प्रा. पी.व्ही. गायकवाड प्रोग्राम ऑफिसर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच सौ. नंदा संतोष भगत, उपसरपंच जाधव दिपक नाना, ग्रामसेवक साळवे नंदकुमार, कृषी सहायक मदने मॅडम, कृषीकन्या आदींसह ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.