महाराष्ट्र

के चंद्रशेखर राव यांचा क्रांतीदिनी सन्मान सोहळा- औताडे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी नुकताच बीआरएस या पक्षात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांचे पश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तेलंगणा मुख्यमंत्री यांचा भव्य सन्मान सोहळा ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूर, जिल्हा सांगली येथे आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतर राज्याप्रमाणे तेलंगणात सुद्धा सुरु होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के चंद्रशेखर राव यांनी धोरण आखून सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी देण्याचा निर्णय केला. आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना राबविली. शेतीला वीज देण्याचा धाडसी निर्णय केला. तसेच खरीप व रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी दहा हजार रुपये थेट मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी रु. पाच लाख सानुग्रह अनुदान दिले. परिणामी राज्यातील शेतकरी आत्म्हत्याचा कलंक पुसला गेला.

तसेच वृद्ध, विधवा, निराधार महिला, कामगारांना दरमहा ३०१६ रु रोख मदत देण्याचा निर्णय राबविला. नॅशनल स्क्रीम रेकॉर्ड्स ब्युरो ऑफ पोलीस या सरकारी संस्थेने केलेल्या नोंदणीनुसार मागील २३ वर्षात लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या. मराठवाड्यात माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालात एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले आहेत असे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी दहा हजार रु मदत करण्याची शिंदे फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र त्यांनी ती धुडकाविली.

शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. उसाला प्रतिटन रु ५००० भाव द्या नाहीतर दोन साखर कारखान्यातील हवाई अंतर कमी करा, शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची उठवा,गौण खनिजावरील कर वसुली थांबविणे, पाटपाणीवरील पाझर कर रद्द करणे आदी प्रश्न संघटनेचे आहेत. ७५ वर्षात आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे.

के चंद्रशेखर राव यांनी “अब की बार किसान सरकार” चा नारा दिला आहे. राव यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याची शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्याला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने सन्मान सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, बी जे देशमुख, शंकरअण्णा धोंडगे, युवराज जगताप आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button