धार्मिक

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवा शनिवार नोव्हेना संपन्न 

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा चर्च हरेगाव मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व पाचवा नोव्हेनाचा शनिवार भक्तिभावात संपन्न झाला.

प्रारंभी पवित्र मरियामूर्तीची परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. नोव्हेनाप्रसंगी फातिमा चर्च राहुरी येशुसदन राहुरी कारखाना येथील धर्मगुरू फा. मायकल राजा, जेकब गायकवाड हे सहभागी झाले होते. त्यांनी ‘आरोग्य दायिनी पवित्र मरिया’ या विषयावर जीवनचरित्र महिमा सांगितला.

त्यावेळी फा. मायकल राजा यांनी उदाहरण दिले की, एक शिक्षिका धर्मशिक्षणाचा तास घेत होती. तिने वर्गात विचारले की स्वर्गात कोणाला जायचे? तर बऱ्याच मुलांनी हात वर केले. पण एका मुलाने हात वर केला नाही, त्याला विचारले की तुला कोठे जायचे आहे? तर त्याने उत्तर दिले की, मला माझ्या आईकडे जायचे आहे. घरी जायचे आहे. आईचे नाते मायेचे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते असते. तशी ही आपली सर्वांची आरोग्य दायिनी पवित्र मरिया आहे. तिचे मनन चिंतन व सन्मान करणे गरजेचे आहे.

तसेच फा. जेकब गायकवाड म्हणाले की, या पवित्र मरीयेच्या यात्रेला लाखो भाविक येतात. त्याचे कारण म्हणजे आपण जे नवस करतो ते ती पूर्ण करते. आपण येतो त्यावेळी फार ऐटीत नटून थटून येतो, आपले लक्ष कपड्याकडेच असते. जपमाळ करताना लक्ष विचलित होते. मनात अनेक समस्या असतात. कामात मग्न असताना प्रार्थनेची आठवण येत नाही. त्यासाठी एकचित्त असणे आवश्यक आहे. तीन रहस्य म्हणण्या ऐवजी आनंदाचे, दु:खाचे व गौरवाचे म्हणण्याऐवजी एकच रहस्य म्हणजे प्रामाणिकपणे, चिंतनपूर्वक केलेली प्रार्थना परमेश्वराला स्विकारणी असते. या नोव्हेनात हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, सचिन, रिचर्ड तसेच सर्व धर्मभगिनी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या ५ ऑगस्ट रोजी “परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मरिया” या विषयावर डॉन बॉस्को चर्च सावेडी, संत जॉन चर्च भिंगार, संत अन्ना चर्च अहमदनगर येथील धर्मगुरू पवित्र मिस्सा व प्रवचन करणार आहेत असे हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले. या कार्यक्रमास भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, हरेगाव, उंदिरगाव ग्रामस्थ आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button