अहमदनगर

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना अतिवृष्टीप्रमाणे अनुदान द्या – सुरेशराव लांबे

राहुरी : शिंदे-फडणवीस सरकारने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केल्याप्रमाणे अनुदान दिले. त्याच प्रमाणे सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतक-यांना त्वरित देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी नायब तहसीलदार संध्या दळवी मॅडम यांना निवेदन देत केली आहे.

सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्रासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु तालुक्यातील सात मंडळापैकी राहुरी या एकाच मंडळाला अतिवृष्टीच्या निकाषाप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यातही या मंडळातील अनेक शेतकर्यांचे अनुदान अजुनही खात्यावर जमा झालेले नाही. दि. १३ जुन २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान जाहीर केले. परंतु शासनाने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान जाहीर केलेल्या धोरणात बदल करून पुन्हा शासनाच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च २०२३ रोजी नव्याने आदेश काढून दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला व आनुदानात कपात करुन कष्टकरी पिडीत शेतकऱ्यांची दिशाभूल करत एकप्रकारे शासनाने थट्टाच केली आहे.

वरील शासन निर्णय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह राहुरी तालुक्यातील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या एनडीआरएफ च्या निकाषाच्या दुप्पट म्हणजेच जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३६०० रूपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७००० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६००० रुपये या प्रमाणे अनुदान मंजुर करुन ते त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रहार जनशक्ती पक्ष सत्तेत सहभागी असतानाही आंदोलन करेल. तरी शासनाने या मागणी विचार करावा, असा विनंती पूर्वक इशारा सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, माजी मंत्री आ.ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहेत.

यावेळी निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, ॲड. रविंद्र धुमाळ, वंचितचे बाबासाहेब मकासरे, भारत जगधने, राजेंद्र घाडगे, मार्तंड गडाख, सतिष खुळे, भाऊसाहेब शिरसागर, प्रकाश शेटे, सोपान पवार, सिताराम पवार, सचिन साळवे, भगिरथ पवार, निलेश जगधने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button