सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी आर्थिक लुट खपवून घेतली जाणार नाही – देवेंद्र लांबे
राहुरी – तालुक्यात शासकीय कामे करताना सेतू केंद्रावर आर्थिक लुट होण्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. सेतू केंद्राच्या बाहेर शासनाने ठरवून दिलेल्या कामांचे दरपत्रक प्रथम दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु काही सेतू चालक सर्वसामान्य लोकांची शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेवून लुट करत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. या विषयी शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे, खा.सदाशिव लोखंडे व मुख्यमंत्री जनकक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक कृष्णा काळे, तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे.
या विषयावर शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सांगितले कि, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या सर्व योजना माहित व्हाव्यात व त्या योजनाचा लाभ गोरगरीब जनतेला व्हावा म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. या योजनेत नागरिकांचे शासन दरबारी अडलेली शासकीय कामे सोडविण्यासाठी तात्काळ उपाय योजना आखण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे करतांना आर्थिक लुट होवू नये व तात्काळ कामे मार्गी लागावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शासन आपल्या दारी या योजनेमुळे सर्वसामन्य जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे.
परंतु राहुरी तालुक्यातील काही सेतू चालकांकडून आर्थिक लुटीच्या तक्रारी समोर येत आहेत. हि आर्थिक लुट थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागात ‘गाव तिथे शिवदूत’ नेमण्यात आलेले आहेत. राहुरी तालुक्यात जवळपास २८० शिवदुतांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शिवदुतांसाठी “अडचण जिथे शिवदूत तिथे” हे ब्रीदवाक्य तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही किंवा माहिती मिळालीच तर अर्ज कसा करायचा? कुणाकडे द्यायचा? कोणते दस्तावेज जोडायचे? असे अनेक प्रश्न समोर असतात. या सर्व बाबी माहित नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहतो. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून शिवदुतांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र लांबे यांनी दिली.
देवेंद्र लांबे पुढे बोलतांना म्हणाले कि, नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी बैठकी दरम्यान सांगितले आहे कि, जे शासकीय कर्मचारी चांगले काम करतील त्यांचा शाल, नारळ देवून सत्कार होणार व जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांना नारळ देणार. याच विषयाचा संदर्भ देत राहुरी तालुक्यात शासकीय स्तरावर जनतेची कामे करतांना कोणी दिरंगाई किंवा आर्थिक लुट करत असतील तर लक्ष ठेवण्याचे काम शिवदूत करणार आहेत. शिवदूत यांना मोबाईल चित्रफित तयार करून तालुका प्रतिनिधी यांच्याकडे पाठवण्याचे आवाहन देवेंद्र लांबे, अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, किशोर मोरे, महेंद्र उगले, महेंद्र शेळके, रोहित नालकर यांनी केले आहे. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगण्यात आले.