कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 25 ते 27 मे, 2023 या कालावधीत 51 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मंत्री, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री अहमदनगर ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री आणि कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत चारही कृषि विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांना, संशोधन तंत्रज्ञानाच्या शिफारशींना तसेच सुधारीत औजारांना चर्चेअंती मान्यता देण्यात येईल. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 5 वाण, फळ पिकाचे 1 वाण, 3 यंत्रे व 74 शिफारशी, दापोली कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 2 वाण, फळ पिकाचे 1 वाण व 38 शिफारशी, परभणी कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 4 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 46 शिफारशी, अकोला कृषि विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे 3 वाण, फळ पिकांचे 2 वाण, 5 यंत्रे व 75 शिफारशी यांचा समावेश आहे. राज्यातील शेतकर्यांच्या उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञान शिफारशी फायदेशीर ठरतात. या बैठकीचा समारोप 27 मे, 2023 रोजी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी दिली.

याप्रसंगी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. प्रकाश आबिटकर, लोकसभा सदस्य खा. सदाशिव लोखंडे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, आ. किशोर दराडे, आ. राम शिंदे, आ. सत्यजीत तांबे, आ. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (कृषि) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषि आयुक्त सुनिल चव्हाण व अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ तसेच राज्यातील इतर तीनही कृषि विद्यापीठांचे कुलगुरु व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे स्वागताध्यक्ष म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button