हरेगाव मतमाउली भक्तिस्थानात प्रथम ख्रिस्त शरीर संस्कार संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रे फा डॉमनिक रोझारीओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, जेम्स थोरात आदी सहभागी होते. या समारंभात प्रथम ख्रिस्त शरीर संस्कार साठी ३७ मुले, मुली, व दृढीकरणसाठी ७७ असे एकूण ११४ मुले मुली होते.
यावेळी प्रमुख याजक नासिक धर्मप्रांत महागुरु स्वामी लूरडस डानियल यांनी प्रतिपादन केले की, आज आपल्या हरेगाव धर्मग्रामसाठी खरोखर प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार हा हर्षाचा दिवस आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आहे. प्रभू आपल्याला प्रसाद देत नाही, अन्न देत नाही तर स्वत:चे शरीर देत आहे.
प्रभू येशूच्या रक्ताने सर्व जगाचे तारण झाले. या संस्काराने प्रभू सार्वकालीन जीवनाची भाकर होऊन सर्व मानव जातीची भूक शमविण्यासाठी ह्या जगात आला. त्याच ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताच्या सेवनात आमच्या जीवनातील सर्व प्रकारची भूक भागविण्याचे सामर्थ्य आहे. ह्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ह्या संस्काराने आध्यात्मिक तयारी केली पाहिजे. एकमेकावर प्रीती करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना क्षमा, दया करा. हे या साक्रामेंताव्दारे स्वीकारतो. आदी संस्कार विषयी महत्व विवेचन केले.
प्रारंभी सोहळ्याच्या वेळी संस्कार स्वीकारणारे मुले मुली समवेत भाविकांची मिरवणूक चर्च प्रांगणात काढण्यात आली. त्यात सर्व धर्मगुरू, महागुरुस्वामी लूरडस डानियल सहभागी होते. मिरवणुकीने चर्चमध्ये प्रवेश करण्यात आला. महागुरुस्वामी यांचा चर्च वतीने सुभाष पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख धर्मगुरू डॉमनिक यांनी विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे आभार मानून महागुरुस्वामी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार बी आर चेडे, सुभाष पंडित आदींचा सन्मान झाला.