अहमदनगर

श्री संत गोरा कुंभार चरित्र आणि भक्तीमाहात्म्य समर्पितेचा आदर्श – आचार्य ह.भ.प. डॉ. शुभम महाराज कांडेकर

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत आणि संत साहित्य ही अमृतमय जीवनप्रेरणा आहे. मध्ययुगीन काळातील श्री संत गोरा कुंभार चरित्र आणि भक्तिमाहात्म समर्पित जीवनाचा आदर्श असल्याचे मत आचार्य ह.भ.प. डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.

येथील माऊली वृद्धाश्रमात वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या श्री संत गोरा कुंभार यांच्या 706 व्या पुण्यतिथी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्य शेळके यांच्या हस्ते माऊली वाचनालयाचे फीत कापून उदघाट्न करण्यात आले. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी आचार्य ह.भ.प. डॉ. शुभम महाराज कांडेकर आणि प्राचार्य शेळके, बापूसाहेब पटारे, सौ.मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते मान्यवर पुरस्कार्थी आणि उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. श्री संत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार लाभलेले प्राचार्य शंकरराव अनारसे, प्रा.दिलीप सोनवणे यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके, प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. वाचनालयासाठी कपाट दिल्याबद्दल राष्ट्रपती पदक विजेते माजी प्राचार्य बबनराव तागड, विविध महामानव, संत, सेवाभावी उपक्रम राबविणारे वृद्धाश्रम प्रमुख सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, सर्व सेवाभावी उपक्रमात योगदान देणारे कवी, पत्रकार राजेंद्र देसाई यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर म्हणाले, वाचन संस्कृतीचा आणि लोक कल्याणकारी उपक्रम घेणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आतापर्यत शेकडो लेखक, कवी यांनी पुस्तक प्रकाशनात योगदान दिले आहे. आता त्यांनी माऊली वृद्धाश्रमावर पुस्तक लिहिण्यास सुभाष वाघुंडे यांना सहकार्य केले तर आदर्श सेवेचा इतिहास समाजासमोर येईल. माऊली वृद्धाश्रमात लोक कल्याणकारी उपक्रम सुरु असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. प्राचार्य शंकरराव अनारसे, सुखदेव सुकळे, प्रा. दिलीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके म्हणाले, संत हे सर्व समाजाचे असतात. केवळ त्या त्या समाजापुरते संत, समाज सेवक होऊ नयेत. त्यांचे चरित्र, विचार आणि कार्य सर्व मानव जातीसाठी असते. संत गोरा कुंभार यांच्या तेर तीर्थक्षेत्राजवळ मी राहणारा असल्यामुळे त्यांचे व्यापक भक्तिकार्य माझ्या मनावर ठसलेले आहे. डॉ. प्रकाश कुंभार, प्राचार्य अनारसे, प्रा. दिलीप सोनवणे यांना मिळालेले साहित्य पुरस्कार ही सर्व समाजाला लेखन प्रेरणा देणारी वाटचाल असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी सौ. छायाताई सोनवणे, डॉ. यशवंत कुंभार, पुंडलिक दहिवलीकर, डॉ आशिष सोनवणे, गणेशानंद उपाध्ये, माजी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, प्राचार्य के. एच. काळे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, लेविन भोसले, शुभम नामेकर, जयश्री श्रीवास्त, कवी आनंदा साळवे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button