पेन्शनर्सचा खा.लोखंडे यांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह
शिर्डी : राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी शिर्डी येथे बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. खासदार सदाशिव लोखंडे यांचे कार्यालयात जाऊन सुरेश कटारिया, पुंजीराम गांडोळे व दशरथ पवार यांनी निवेदन दिले.
यावेळी उपस्थित पेन्शनर्स यांना सुभाष पोखरकर, सुकदेव पाटील, पुंजाराम गांडोळे, चिंतामणी यांनी मार्गदर्शन केले. ईपीएस 95 पेन्शनर्सचा कमांडर राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेली ६ ते ७ वर्षांपासून देशभर लढा सुरू असून केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत उदासीन असून आजपर्यंत आश्वासन शिवाय काही पदरात पडले नाही. खासदारांनी हा विषय लोकसभेच्या अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी रविवार दि.२ एप्रिल पासून कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
दरमहाचे पगारातून पेन्शन फंडात मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली आहे. पण वृद्धावस्थेत अतिशय अल्प पेन्शन दिली जात आहे. त्यामुळे पती-पत्नी यांना जीवन जगण्याइतपत म्हणजेच दरमहा रु ७५०० पेन्शन, महागाई भत्ता, मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून आज रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे. शिर्डीचे खासदार यांना दोन वेळा संधी मिळूनही गेल्या ८ ते ९ वर्षात एकही सभागृहात पेन्शन धारकांचा प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल पेन्शनरांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी राहाता तालुकाध्यक्ष सुकदेव पाटील आहेर, राहुरी तालुकाध्यक्ष ज्ञानदेव डौले, चिंतामणी ( लोणी), आनंदा हासे ( चिखली), कारभारी मोरे (गणोरे) यांच्यासह राहुरी, संगमनेर, अकोले तालुक्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोजच्या आंदोलनात शिर्डी अध्यक्ष पवार, सुभाष अरसुळे, पुंजापाटील कोते, संपत शेळके, मुठे आदींसह स्थानिक पेन्शनर्स बसतात व आलेल्या सर्वांना सेवा देत आहेत.