कृषी

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा फायदा परदेशातील कृषि विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी होईल-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

संरक्षीत शेतीवरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

राहुरी विद्यापीठ : आंतरराष्ट्रीय कृषि विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांना संशोधन करण्यासाठी देवाण घेवाण प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामुळे मदत होण्याबरोबरच परदेशातील विविध कृषि विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी होईल. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नाहेप प्रकल्पाचे नेहमीच प्रोत्साहन राहिले आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (नाहेप-कास्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षीत शेतीसाठी गुगल अर्थ इंजिन, आय.ओ.टी. व ड्रोन आणि हवामान अद्ययावत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे कृषि विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन कास्ट प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होत्या. यावेळी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार व हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते.

यावेळी डॉ. अनुराधा अग्रवाल आपल्या भाषणात म्हणाल्या की शेती क्षेत्राची सेवा करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे भारतीय शेती शाश्वत होईल. कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशात होणारे संशोधन पाहण्यासाठी संधी मिळाली असून विद्यार्थ्यांना याचा उपयोग त्यांच्या लाईन विभागातील संशोधनासाठी होईल.

याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापकांनी अमेरीका, जापान व बैंकॉक या देशातील विविध विद्यापीठात चालणार्या संशोधन पाहण्यासाठी भेटी दिल्या होत्या. त्या शास्त्रज्ञांना यावेळी संबंधीत विद्यापीठांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. बापुसाहेब भाकरे, डॉ. दिलीप पवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सुनिल मासाळकर, डॉ. महानंद माने, डॉ. सचिन नलावडे, डॉ. विक्रम कड, डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. रवि आंधळे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. सुनिल कदम, डॉ. अवधुत वाळुंज, डॉ. सोमनाथ माने व डॉ. सचिन डिंगरे यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार डॉ. अतुल अत्रे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 100 पेक्षा जास्त प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button