अहमदनगर

प्रदर्शनात जिवंत मधमाश्या…‌‌ गोदागिरी फार्म्सच्या स्टॉलला उदंड प्रतिसाद

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आजी मधमाशी… बाय बाय मधमाशी… बापरे मधमाश्या… आईग मधमाश्या… आरे मधमाश्या बघ… पप्पा हनी बी, वाव्ह !!! असे अनेक उत्सुकतेने आनंदभरात उदगार नगरकरांच्या व बालगोपालांच्या तोंडून गेल्या पाच दिवसांपासून निघत होते.
अहमदनगर येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषद, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशुधन प्रदर्शनात गोदागिरी फार्म्स शेतकरी गट, माळेवाडी यांनी प्रदर्शनात जिवंत मधमाशी पेटी मॉडेल मांडले होते. भेट देणाऱ्या प्रत्येकाला मधमाशी विषयीची इत्यंभूत माहिती या अभिनव उपक्रमातून दिली गेली. या स्टॉलला भेट देणारा प्रत्येकजण मधमाशी पेटी मधील हालचाली, साठवलेला मध, मधमाशीचे अंडे, पराग बघून आश्चर्यचकित होत होता. 
आजपर्यंतच्या बऱ्याचशा कृषी प्रदर्शनात पशुधन, जिवंत देखावे दाखवण्यात आले होते, परंतु मधमाशी जिवंत पेटी ठेवण्याचा अभिनव प्रयोग श्रीरामपूर येथील गोदागिरी फार्म्सद्वारे करण्यात आला. शेतीमध्ये अजाणतेपने हजारो वर्षापासून परागीभवन करणारी व बदल्यात मध देणारी त्याचबरोबर शेतकऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या मधमाशीचे कार्य, महत्त्व व मधमाशी पालना बाबत जनजागृतीचा हेतू प्रदर्शनाद्वारे साध्य झाल्याची माहिती गोदागिरी फार्म्स शेतकरी गटाचे संचालक ऋषीकेश औताडे यांनी दिली व अभूतपूर्व अशा कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button