अहमदनगर
सचिन लाटे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित
बाळकृष्ण भोसले | राहुरी : तालुक्यातील चिंचोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन लाटे यांना टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेचा मानाचा असा समाजभुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या त्यांच्या यशाबद्दल चिंचोलीसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
चिंचोली येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रस्थानी असणारे युवा व्यक्तिमत्व सचिन या ना त्या सामाजिक कामातून जनतेत लोकप्रिय राहिला आहे. अगदी उमेदीच्या काळापासून सर्वसामान्यांच्या कामाची व त्यांच्या हाकेला ओ देत हरएक प्रकारचं सहकार्य करण्याचा त्याचा हा छंद त्याने गत १५ ते १६ वर्षे अव्याहतपणे न थकता जपला, वाढविला, नि सर्वदुर पोहोचविला. जनतेप्रती समरस होत त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी कोणतीही सत्ता असणं गरजेचं नाही असा संदेशच जणू त्याने सर्वांना दिला आहे. नगर-मनमाड महामार्गच्या दुरावस्थेबद्दलचं आंदोलन असो की स्थानिक रस्त्यांचा प्रश्न सचिन नेहमी आंदोलनाच्या अग्रभागी राहिलेला दिसतो.
दुष्काळाच्या काळात प्रवरा नदीवरील कोल्हापूर बंधारे भंडारदरा धरणातून भरण्यासाठीचा प्रश्न, ऊस भाव वाढीसाठीचे आंदोलन, सोयाबीन पेरणीवेळी काळे निघालेल्या बियाणांसंदर्भातलं उग्र आंदोलन करून बळीराजाला नुकसान भरपाई मिळवून देण्याचं विधायक काम, राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कोल्हार उपबाजारातील वजनकाटे सदोष असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणत ते बदलण्यासंदर्भातला विषय ऊन्हाळ्यातल्या पाणपोई, शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पिक विमा संदर्भातल्या प्रश्नाविषयी आवाज उठवत रामपूर, कोल्हार खुर्द, चिंचोली, आंबी, दवणगाव, केसापूर आदी गावांसाठी खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे निधीसाठी आग्रह धरून तो मिळवून दिला.
चिंचोली गावासाठी जवळपास ७० ते ८० लाखाचा निधी त्यावेळी मिळवून देण्याचा प्रयत्न त्याने केला. मोफत नेत्र व आरोग्य शिबीरे, गावातच गॅस मिळण्यासाठीचा प्रयत्न यासारखी नेहमी सर्वसामान्य जनतेशी निगडीत कामांना सचिनने प्राधान्य दिल्याने तो जनतेचा चेहराच बनून गेला. गोरगरिबांच्या दैनंदिन छोट्या छोट्या गरजा ओळखून त्यांना मदत करण्याचा त्याचा प्रयत्न सातत्याने निर्णायक राहिला आहे. याच त्याच्या कार्याची दखल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेने घेत संस्थेने नुकत्याच आयोजिलेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात त्याचा ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे हस्ते समाजभुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या त्याच्या कार्यगौरवाबद्दल चिंचोली व परिसरासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.