अहमदनगर

भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीला न विसरता समाजऋण फेडावे – प्राचार्य के. एस. काळे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पूर्वीच्या काळी शिक्षण घेणे ही तारेवरची कसरत होती. भूतकालीन प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता आम्ही उपासमारी सोसत शिकलो. त्या परिस्थितीला न विसरता आपण ज्यांनी उपकार केले, त्यांचे व समाजाचे समाजऋण फेडले पाहिजेत. त्यादृष्टीने माऊली वृद्धाश्रमातील कार्याला मदत करावी असे आवाहन माजी प्राचार्य के. एस. काळे यांनी व्यक्त केले.
येथील माऊली वृद्धाश्रमात देणगी, वाचनालय, प्रबोधन आदी विविध सेवाभावी कार्यक्रमाचे प्राचार्य काळे यांच्या 77 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले  होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. माऊली वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांनी स्वागत करून 2017 च्या माऊली वृद्धाश्रमाची वाटचाल सांगून प्राचार्य काळे व सौ. काळे यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी श्री व सौ. काळे यांना शुभेच्छा देताना म्हणाले, आयुष्य खूप सुंदर आहे, ते सकारात्मक आणि समर्पित दृष्टीने जगले की खरा आनंद मिळतो, असा आनंद काळेसाहेब घेत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संयोजक आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी प्राचार्य काळे यांचा सेवाभावी जीवनकाल सांगून सन्मान केला.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी मानवी जीवन आणि आता उरलो उपकारापुरता या विषयाच्या संदर्भाने विवेचन करीत माणसाने देतो तो देव असे जीवनप्रसंग सांगत, निरपेक्ष, सेवाभावी वाटेवरचे जीवन जगावे, त्यातच खरे समाधान आहे. प्राचार्य काळे यांनी हाच मंत्र हातीमाथी जपला आहे, असे डॉ. उपाध्ये यांनी सांगून माऊली ग्रन्थालयासाठी सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांना अनेक पुस्तकांची भेट दिली. वाचन संस्कृती जपली तर जगातील दुःख हरेल नि सुखाचे प्रवाह निर्माण होतील असे सांगितले. हाच धागा पकडीत राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी मुख्याध्यापक बबनराव तागड यांनी प्राचार्य काळे यांचा सन्मान करीत, आदर्श सांगत ग्रंथालयासाठी काचेचे कपाट जाहीर केले. शेटेसाहेब, बापूसाहेब पटारे, माजी प्राचार्या सौ.विमलताई पटारे, सुखदेव सुकळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य काळे म्हणाले, माऊली वृद्धाश्रमात इतकी चांगली वागणूक वागणूक दिली जाते, हे पाहून आता आम्ही पतीपत्नी येथेच राहण्यासाठी येण्याचा विचार करीत आहोत, असे सांगून वाघुंडे पतिपत्नीचे कौतुक केले आणि दोन हजार रुपयांची देणगी दिली. सर्वांना भरपूर खाद्य पदार्थ दिले. मनोहर जाधव, सौ. सुरेखा जाधव, शुभम नामेकर, भीमराज बागुल यांनी नियोजन केले. प्राचार्य डॉ. गागरे यांनी अध्यक्ष भाषणातून काळे पतिपत्नीचे जीवन हे सेवाभावी, निर्मळ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सौ.सुरेखा जाधव यांनी केले तर भीमराज बागुल यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button