कॉलेज कट्टा

कॉलेज कट्टा – भाग ५१

शिक्षणाचा मूळ हेतू हा ज्ञानार्जन करणे, ज्ञानग्रहण करणे, ज्ञानप्राप्ती करणे! असाच असायला हवा. एखादा विद्यार्थी किती शिकला? हे मोजण्याचे मापदंड, मोजणीची परिमाणे आज तरी आपल्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. जे मापदंड प्रचलित आहेत तो एकमेव मापदंड म्हणजे परीक्षापद्धती ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न ? आजचा कट्टा अर्थातच परीक्षा कट्टा.
आपल्याकडचे सगळे विद्यार्थी हे मार्कांसाठी परीक्षा अर्थात परीक्षार्थी झालेले आहेत. परीक्षेपुरता जन्म आमचा आम्ही देऊ परीक्षा! रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त एकच ध्यास मनी ठेवणारी! यांचा एक कट्टा असतो. या कट्टयामध्ये महाविद्यालयाचे शंभर टक्के विद्यार्थी सहभागी असतात. पण परीक्षा कट्ट्याचे अनेक भाग पडतात. त्यातला पहिला कट्टा म्हणजे सात्विक, साजुक, अत्यंत धार्मिक पणाने परीक्षा देणारे विद्यार्थी. अर्जुनाला जसं फक्त डोळा दिसतो, तशीच काहीशी यांची अवस्था, परीक्षे पलिकडे यांना काहीही दिसत नाही, त्यामुळे अत्यंत प्रमाणबद्ध, प्रत्येक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून, हे लोक परीक्षा देतात! गाळलेल्या जागा भरा, टिपा लिहा, कारणे लिहा, सविस्तर प्रश्नांची उत्तर द्या! वगैरे! वगैरे वगैरे !!! अशा प्रकारे वेगवेगळे गुण मिळवून परीक्षा देऊन ही चांगल्या गुणांनी पास होतात. सातत्याने अभ्यास करतात…
परीक्षा पद्धतीचे अनेक प्रवाह बघायला मिळतात. अजिबात कॉपी न करणारे, दुसऱ्याला कॉपी करू न देणारे, मागेपुढे बघत कॉपी करणारे, कॉपी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरून पास होण्यासाठी ढोंग करणारे आणि हो गेल्या दोन वर्षात ऑनलाइन परीक्षांचा झालेला धुमाकूळ की सुकाळ… 🤐🤭
       
         सातत्याने अभ्यास करणारी मुले ही परीक्षेत बऱ्याच वेळा टॉप क्लासला असतात. त्यांच्या लेखी परीक्षा ही प्रायोरिटी असते आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट ही परीक्षा, परीक्षा, परीक्षा … यापलीकडे ते बघत नाहीत.
थ्री इडियट मधल्या चतुर च्या जात कुळीत यांच्यातल्या काही जणांचा अंतर्भाव होतो. म्हणजे परीक्षेत पहिले येण्यासाठी एक तर सर्वांच्या पुढे जायचं, खूप अभ्यास करायचा, किंवा इतरांना अभ्यासात मागे पडण्यासाठी काही कारणाने त्यांना मागे ठेवायचचं, त्यांचे मन डायव्हर्ट करायचं. त्यांचे मन विचलित करायचं. अशांची संख्या फारच मर्यादित असते. जे खरोखर मन लावून अभ्यास करतात. परीक्षेत चांगले गुण मिळवतात, त्यातली अनेक जण ठराविक प्रकारच्या परीक्षांमधून पुढे पुढे जात राहतात. त्यातली काही आयएएस, काही आयपीएस होतात. कारण यांना अभ्यासाचा ध्यास लागलेला असतो. त्यांना अभ्यासाची गोडी लागलेली असते आणि म्हणूनच त्यातली काही मुलं पुढे पुढे जातात.
ग्रामीण भागामध्ये पहिल्या पाचात आलेली मुलं जेव्हा विद्यापीठांमधून शिकायला जातात, त्यावेळी ती कमी पडतात. मला आठवते आमचा एक विद्यार्थी भौतिकशास्त्र विषयात पहिला आला होता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागामध्ये त्याच्या पहिल्याच सेमिस्टरला जवळपास सर्व विषय राहिले होते. दुसऱ्या सेमिस्टरला तसेच झाले आणि मग विद्यापीठातले शिक्षण त्याने सोडून दिले. वास्तविक परीक्षा पद्धती एकच असताना असे का घडावे?
काही विद्यार्थी मात्र कायम पहिला की दुसरा की तिसरा? असे एकमेकात दुस्वास करतात. विनाकारण स्पर्धा करतात या स्पर्धेत निष्पन्न तसं फार कमी निघत. वास्तविक स्पर्धा आपल्याशी असावी आपुलाचि वाद आपणाशी हे ज्याला समजते तो आयुष्यात खूप मोठा होतो. मला नेहमी एक प्रश्न पडतो परीक्षेला पर्याय आहे का? ( जिज्ञासूंनी हेरंब कुलकर्णी यांचे परीक्षेला पर्याय काय हे संपादित केलेलं पुस्तक जरूर वाचावे )
     
वास्तविक परीक्षेला पर्याय आहेत आपल्याकडे ते येऊ घातलेली आहे आणि आपण परीक्षा या कट्ट्या बद्दल बोलूया आणि मग शेवटी परीक्षेला पर्याय काय? या विषयावर नक्की भाष्य करूयात मुळात आपल्याकडे परीक्षा का आल्या अर्थात ही पद्धती चाचा मेकाले ( uncle meckole ) यांची किरपा म्हणायची.
त्यावेळी ठीक होतं इंग्रजांना फक्त बाबूच तयार करायचे होते, कारकून हवे होते आणि म्हणून कारकून करण्यासाठी आपल्याकडची धडधाकट गुरुकुल पद्धती बंद करून इंग्रजाळलेली पद्धत आणली. दीडशे वर्ष चालली. पुढे आपण त्यात काही बदल केले पण ते नावापुरतेच… काळ झपाट्याने बदलतो आहे जुन्या पिढीच्या शिक्षकांना परीक्षा हव्यातच असेच त्यांना वाटने. स्वाभाविक आहे आणि म्हणून त्याला कायम विरोध करत राहणार कारण बदल कोणालाच नको असतो. सात-आठ महिने अभ्यास केल्यानंतर तीन तासात किंवा परीक्षेची पद्धती आहे. तीन तासाची दोन तासाची किंवा एक तासाची या एवढ्या कमी वेळात या मुलांचे मूल्यमापन करणं हे किती कठीण होत असेल, पेपर कसे तपासले जातात. या बाबतीत मुलांच्या मनामध्ये कायम खूप अफवा असतात. तो वेगळ्या कट्ट्याचा विषय कदाचित होऊ शकेल परंतु आपण मात्र विद्यार्थ्यांच्या कट्ट्या विषयी बोलत आहोत म्हणून डायव्हर्ट नको व्हायला.
चला तर परीक्षार्थी न होता परीक्षेला पर्याय काय देता येतील यावर विचार करू या…
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, टी जे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

Related Articles

Back to top button