कॉलेज कट्टा

कॉलेज कट्टा – भाग ५३

मी प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्या वर्षी, सुरुवातीच्या काळात, काही मुलं माझ्याकडे यायची आणि “सर टॉयलेटमध्ये कोणीतरी घाणेरडे काहीतरी लिहिलेले आहे, चित्र काढलेली आहेत” किंवा “कोणाचे तरी नंबर लिहिलेले आहेत!” अशी तक्रार करायची. असं करणारी मंडळी ही अत्यंत विकृत, दर्जाहीन, संस्कार शून्य असतात. आजच्या कटटयाचं नाव आहे विकृत कट्टा.
समाजामध्ये आणि एकूणच आपल्या आसपास, महाविद्यालयांमध्ये चार-दोन टाळकी अशी असतात की जी, संस्कारहीन, असंवेदनशील, कसलाही सारासार विचार न करणारी!, बुद्धिभेद करणारी, स्वतःची अक्कल न वापरणारी, असतात. ते असतात अत्यंत कमी संख्येने, पण घाण मात्र अशी करतात की, ही ब्याद नकोच असं वाटायला लागतं… समाजाला लागलेली कीड असतात बापडी. ही नतद्रष्ट, काय काय? उद्योग करतात ? खिडकीत किंवा इमारतीच्या टोकावर जायचं! कागदाचे बारीक तुकडे करायचे आणि वरून कागद फेकून द्यायचे… गोळा करताना शिपायांच्या कंबरी मोडल्या तरी चालेल. कागदाचे बोळे करायचे! स्वतःला हिरो समजायचं! कागद फाडायाचे आणि फेकून द्यायचे. प्रश्नपत्रिका घरी नेणे! यांना पाप वाटतं! पेपर संपल्यानंतर प्रश्नपत्रिका सुद्धा बरोबर न नेणारी मुलेही याच कॅटेगिरी मधली…
कधी एकदा वर्गात शिक्षकांकडून खडूचा तुकडा पडतोय, कधी एकदा फळ्यावर वाईट साईट लिहितोय असे यांना होते. कोणाची तरी मोबाईल नंबर, विकृत काहीतरी!!! लिहायचं अश्लील, अश्लाघ्य, कसलीतरी नकोशी चित्र काढायची, किंवा टॉयलेट्स मधून कोळशाच्या वा इतर साहित्य आणि पेन च्या साह्याने काहीतरी घाणेरडे लिहायचं आणि दुसऱ्याला लाज वाटेल अशा प्रकारचं लिखाण करून दुसऱ्यांना बदनाम करणे… महाविद्यालयांमधून नवीन काही केलं की लाथा घालून तोडणार यांचा एक आवडीचा उपक्रम… टॉयलेट मध्ये कडापे लावलेले लावले की मग भांडी बसवली किती लाथेने धडकवायची एकमेव अजेंडा…
आई बापाच्या पैशावर घेतलेल्या गाडीचे सायलेन्सर ची पुंगळी काढायची आणि धाड धाड धुडूम आवाज करत इकडून तिकडं ती गाडी पळवायची, किंवा एका गाडीवर किती जणांनी बसायचं याला काही मर्यादाच यांच्या लेखी नसतात किंवा खुर्चीवर वा बाकावर चींगम चिटकवून ठेवणे, काचेच्या तावादानावर दगड मारणे, चोरून ट्यूबलाइट चोरणे, पाईप तोडणे, दुसऱ्यांच्या गाड्यांवर कर्कटक ने किंवा तत्सम अणकुचीदार वस्तूने फाडणे, पेट्रोलच्या टाकीमध्ये वाळू किंवा साखर टाकणे गाडी सुरू होऊ नये म्हणून त्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल ठेवणे, प्रयोगशाळांमध्ये दुसऱ्याच्या परीक्षा नळ्या, काचेची चंचुपात्र, पोर्सलीन डिशेश थर्मामीटर फोडणे… ती काच खळकन फुटली की, आनंद व्यक्त करणे, मुद्दामून नळ चालू ठेवणे, वर्गातले बंद केलेले बल्ब, फॅन पुन्हा चालू करणे, एखाद्याचा काही काम चालू असेल तर त्या कामात मोडता घालने, फोडाफोडी करणे, एसटी बस मध्ये किंवा एखाद्या वाहनात बसल्यानंतर सीट फाडणे, दुसऱ्यांचे फोटो कााढणे, त्यांचे टिक टोक वर व्हिडिओ तयार करणे, वगैरे, वगैरे…
रात्री बारा वाजता कुठेतरी उभा राहून गाडीवर केक कापणे, कोणाच्या तरी तोंडाला भरमसाठ केक कापून एकाचा जीव गेल्याचं मागच्या काही महिन्यात आपण व्हायरल झालेली पोस्ट पाहिली असेलच. अशा कितीतरी विकृती सांगता येतील. या विकृती सांगतो, याचा अर्थ हे तुम्ही करा, असं सांगण्याचा हेतू नाही… ही अर्थातच विकृती असते ही जन्मजात नसते, ही येते ती, ज्या वातावरणात हे वाढतात , घरच वातावरण किंवा घरचे संस्कार लहानपणीचे उद्योग, जसे पुस्तकातल्या मोनालिसाला मिशा काढणे, या पानावरुन त्या पानावर जा, त्या पानावरुन ह्या पानावर जा, असे लिहिणे, ग्रंथालयात जाऊन लायब्ररीची पुस्तके फाडणे, किंवा पुस्तके चोरण या सर्व विकृतीच आहेत. धाक नसला की अशा गोष्टी घडत असाव्यात.
ही ओळखण्यास सोपे असतात, एकटी कधीच नसतात, जोडीजोडीने किंवा तीन-चार जण मिळून असा यांचा ग्रुप असतो. खालच्या थरावरची मानसिकता असते, हे मनोरुग्ण असतात यांना काउन्सिलिंगची अत्यंत गरज असते, यांना मानसिक उपचारांची गरज असते, या वयात हा दांडगेपणा केलेला त्यांना कळत नाही. त्यांच्या भाषेत मज्जा वाटते. पण नंतर आयुष्य जगताना, या सगळ्याना, भयानक त्रास होतो आणि तेव्हा मात्र हळहळ व्यक्त करतात. यांचे शिक्षण नीट होतं अशातला भाग नाही. रडतखडत पास होतात. मुळात या विकृतीमध्ये अनेक उपद्व्याप होतात. जसे कॉपी करणे कायम चीटिंग, आयुष्यच चीटिंग होतं आणि मग यांना आयुष्य चीट करते. यांचे कसलेच उद्योग सरळ नसतात. आता अनेक महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे , शिस्त समिती, कायदे ,नोटीस बोर्ड सगळे केलेले असतात. तरीसुद्धा स्वतःला, इतरांना फसवायचे अनेक उद्योग हे शोधत असतात. वास्तविक हे समाजाला महाविद्यालयाला फसवत नाहीत हे स्वतःला फसवतात. 
न्यायालयामध्ये एक खटला चालू असतो, चोराने बँक लुटलेली असते. न्यायाधीश चोराला विचारतात “तुला शिक्षा काय करायची किंवा तुझी शेवटची इच्छा काय आहे”. तो म्हणतो “मला माझ्या आईच्या कानाखाली मारायची” कोर्ट अवाक होतं. गुन्हेगार म्हणतो, ” लहानपणी मी जेव्हा शाळेतन, वस्तू चोरून आणायचो इतर मुलांच्या वस्तू चोरून आणायचो त्यावेळी आई म्हणायची छान केलस”, किंवा मला लागणाऱ्या वस्तू वडील घरी आणायचे कुठून आणायचे माहिती नाही, आणि मग हळूहळू माझं धाडस वाढत गेले आणि चोरीचे प्रमाण वाढले. आज मी अट्टल दरोडेखोर झालो. ही गोष्ट समजून घेणाऱ्यांसाठी खरतर आपण सगळ्यांनी पालकांपर्यंत हा कट्टा जरूर सांगितला पाहिजे. आपल्या आसपास असे प्रकार करणारे अर्थात घाणेरड्या वृत्तीचे खालमानेने पाताळ धुंडनारे, विकृत माणसं सापडतात. आपल्याला लगेच ओळखता येतात. ही पोस्ट वाचणारे यातले नक्कीच नाहीत. याची मला खात्री आहे. पण आपल्या आसपास कोणी असेल तर त्यांना लगाम घालावा लागेल. आधी चार मित्रांनी समजावून सांगणे. समजले तर ठीक, नाहीतर शिक्षकांना सांगणे, जमलं तर मानसशास्त्राच्या शिक्षकांपर्यंत आणून आणि सगळ्यात शेवटी आहेतच प्राचार्य. आमच्या पर्यंत आल्यानंतर आम्ही त्याला वठणीवर आणतोच. चांगल्या अर्थाने यातून मला माहिती आहे की, त्यांचा मानसशास्त्रीय समुपदेशन केल्यानंतर अनेक मुलं ही चांगल्या मार्गाला लागतात. आता अशा मुलांची संख्या कमी झालेली आहे. पण तरीसुद्धा समाजामध्ये अशी माणसं भेटतात.
जपान मधले उदाहरण सांगितले जाते की, जपानमधल्या ट्रेनमध्ये जर एखाद सीट फाडलेले असेल तर, एखादी आजी किंवा एखादा मुलगा आपल्या बॅगेतन सुईदोरा काढतो, शिवून टाकतो. आपल्यातले किती जण सुईदोरा, ठेवतील. मुळात आपल्या किती जणांकडे सुईदोरा असतो. दुसरे उदाहरण सांगितले आहे की, एक जपानी माणूस, आपल्या भारतीय रेल्वे मध्ये जात असताना समोरच्या माणसांनी ऊस खाल्ले आणि उसाच्या चुईट्या खाली टाकल्या, जपानी माणसाने त्या उचलल्या, धुतल्या आणि त्यापासून छान वस्तू तयार केल्या आणि ज्याने टाकले होते त्यालाच भेट दिल्या. ही सर्व सृजनता, ही नाविन्यता हा इनोवेटिवनेस येण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. इतरांना धडपड करायला भाग पाडले पाहिजे. विकृतच्या नांग्या जागच्याजागी ठेचल्या पाहिजे.
चला तर विकृतांना ओळखूयात. त्यांना धडा शिकवू या! 
पण आपण विकृत होणार नाही ना!
आपले मित्र विकृत होणार नाहीत ना!! 
याची मात्र काळजी घ्या.
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, शेठ टीकाराम जगन्नाथ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

Related Articles

Back to top button