कृषी

भरडधान्याच्या पौष्टीकतेबाबत जागृत असणे गरजेचे – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक दलवाई

राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांची कृषि विद्यापीठास भेट
राहुरी विद्यापीठ : शासकीय योजनांच्या सहाय्याने तसेच शास्त्रज्ञांनी विकसीत केलेल्या नविन तंत्रज्ञानाने भरडधान्याची शेती फायदेशीर ठरु शकते. भरडधान्यांमध्ये असलेली पौष्टिकता मानवी आरोग्यासाठी गरजेची आहे. आपल्या गरजेएवढी भरडधान्याची उपलब्धता सहजपणे होणे त्याचबरोबर त्याची परवडणारी क्षमता व या सगळ्याची जाणीव असणे हे महत्वाचे आहे. अन्न ही मानवाची प्रमुख गरज असून ती शेती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. याचबरोबर भरडधान्याची पौष्टिकता महत्वाची असून त्याकरीता जागृत असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.
देशभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष 2023 साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात पौष्टिक भरडधान्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना उद्देशून डॉ. दलवाई बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. गोरक्ष ससाणे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. दलवाई पुढे म्हणाले की शेतकर्यांसाठी भरडधान्याचे उत्तम बीज आणि अधिक उत्पादनशील वाण यावर संशोधन होणे गरजेचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे हवामान बदलाचा सामना आपण करु शकतो. डॉ. उत्तम चव्हाण यांनी भरडधान्यामधील पौष्टीकमुल्ये या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त विद्यापीठामध्ये वर्षभरात नियोजीत केलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक यांनी पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त वेगवेगळ्या तृणधान्याच्या माहितीसह विद्यापीठात होत असलेल्या संशोधनाची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवी दिल्लीच्या कृषि वैज्ञानीक परिक्षेत यशस्वी झालेल्या काशिनाथ तेली या विद्यार्थ्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाच्या ड्रोन प्रयोगशाळा, आय.ओ.टी. तंत्रज्ञानचलीत सिंचन प्रणाली, रोबोटीक्स तंत्रज्ञान प्रयोगशाळा, आय.ओ.टी. पार्क, कास्ट-कासम प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, ज्वारी सुधार प्रकल्पाला भेटी दिल्या. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. दीपक दुधाडे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. सुनिल कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. रवी आंधळे यांनी माहिती दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button