ठळक बातम्या

आनंदवनातील ’श्रीरामपूर पॅटर्न’ आणि सत्कारापेक्षा सत्कार्य महत्वाचे- डॉ. विकास आमटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – नुकताच विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान श्रीरामपूर या संस्थेच्या वतीने आनंदवनचे विश्वस्त सदाशिव नथ्थुजी ताजणे यांना स्व.ॲड.रावसाहेब शिंदे स्मृती समाजसेवा पुरस्कार आनंदवन येथे प्रदान करण्यात आला. महारोगी सेवा समितीचे प्रमुख विश्वस्त सचिव डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आनंदवनातील ’श्रीरामपूर पॅटर्न’ आणि ‘सत्कारापेक्षा सत्कार्य’ श्रीरामपूरकरांनी निर्माण केले, असे उद्गार विकास आमटे यांनी काढले.
प्रथमतः डॉ. सौ. भारतीताई आमटे आणि विकास आमटे या उभयतांचा सुखदेव सुकळे यांनी शाल, बुके आणि पुस्तक देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केला. आनंदवनशी स्व. ॲड. रावसाहेब शिंदे यांचा चाळीस वर्षांपासून संबंध आला. महामानव बाबा आमटे आणि ॲड.रावसाहेब शिंदे यांचे दृढ नाते तयार झाले. त्यांचे एवढे प्रेम होते की, महामानव बाबा आमटे आणि स्व. साधनाताई हे चारवेळा श्रीरामपुरात आले. त्यामुळे श्रीरामपूरकरांना बाबांचे दर्शन झाले हे श्रीरामपूरकरांचे भाग्यच. महामानव बोरावके महाविद्यालयात आले, याप्रसंगी ५००० विद्यार्थी उपस्थित होते. हे केवळ रावसाहेब शिंदे यांच्यामुळे घडले. डॉ. विकास आमटे आणि शिंदे यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे झाले ते ॲड. रावसाहेबांच्या हयातीपर्यंत राहिले. हाच धागा पकडून सुखदेव सुकळे यांनी रावसाहेब शिंदे स्मृती समाजसेवा पुरस्कार आनंदवनात सदाशिव ताजणे यांना देण्याचे नियोजन केले, असे उद्गार सुखदेव सुकळे यांनी स्वागत व प्रास्ताविकात काढले.
सदाशिव ताजणे यांनी स्वतःचे दोन्ही पाय अधू असताना कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करणार्‍या महामानव बाबा आमटे यांच्या आनंदवनातील सेवायज्ञात स्वतःला समर्पित केले. संधीनिकेतन, अपंगांची कार्यशाळा, स्वरानंदवनाच्या माध्यमातून दिव्यांग, अनाथ, विधवा आदिंच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात स्वाभिमान जागृत करून जगण्याची नवी उमेद निर्माण करणारे आनंदवानाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणारे प्रेरणायोगी सेवाभावी व्यक्तिमत्व सदाशिव ताजणे यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, प्राचार्य टी.ई. शेळके समन्वयक व मार्गदर्शक प्रा. बाबुराव उपाध्ये यांच्या मार्गदर्शनातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना, महामानव बाबा आमटे, साधनाताई आमटे आणि डॉ. विकास आमटे यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला, आशिर्वाद मिळाले. डॉ.विकास आमटे आणि डॉ. भारतीताई आमटे यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. मला सेवेच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. त्यांनी मला स्वरानंदवन आर्केस्ट्रा प्रमुख केले. त्यामुळे महाराष्ट्रभर माझी भ्रमंती असते. याच माध्यमातून स्व. ऍड.रावसाहेबकाकांची व माझी जवळीक वाढली. त्या भागात काकांनी सहा-सात कार्यक्रम घडवून आणले. त्यांचे आनंदवनासाठी कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे भावपूर्ण उद्गार सदाशिव ताजणे यांनी काढले. सदरचा पुरस्कार आनंदवनला समर्पित केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमात महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, माधव कवीश्वर, आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ, सौ.आशाताई सदाशिव ताजणे, उसगाव येथील पांडुरंग वासेकर, अनिल ठाकरे, अरविंद ठाकरे, बंडू आगलावे, कैलास देरकर, सचिन उईके, श्रीरामपूरहून आलेले बाळासाहेब बुरकुले, उज्वला बुरकुले, सुबोध बुरकुले, सुमित लटमाळे, ओंकार म्हमाणे, पत्रकार बंधू, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव सुकळे यांनी केले तर आभार उज्वला बुरकुले यांनी मानले.

Related Articles

Back to top button