कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे हॉर्टसॅप अंतर्गत शेतकर्यांच्या बांधावर मार्गदर्शन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील वडनेर, कनगर खुर्द, कनगर बुद्रुक, तांभेरे व टाकळीमिया या गावांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रविण बाबासाहेब खैरे, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनेतील डॉ. प्रकाश मोरे व राहुरी तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे व कृषि सहाय्यक अतुल काळे यांचा समावेश होता.
या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंबाच्या अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. सध्या शेत शेतकर्यांच्या डाळिंब पिकावर रस शोषण करणार्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये फुलकिडे या किडीचा व बुरशीजन्य मर, फळ व पानावरील तेलकट डाग या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्या अनुषंगाने कीड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे व वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button