कृषी

हवामान बदलाला तोंड देण्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड फायदेशीर – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

भारतातील हवामान औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी पोषक
राहुरी विद्यापीठ : भारतातील प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी आढळतो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या आजारांवर औषधी वनस्पतींद्वारेच उपचार व्हायचा. कोरोनाच्या काळातही औषधी वनस्पतींच्या उपचार परिणामकारक ठरला. औषधी वनस्पतींची बाजारपेठ मोठी असून भारतातील हवामान औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी पोषक असे आहे. त्याचबरोबर हवामान बदलाला सामोरे जातांना शेतकरी बांधवाना पीक पध्दतीत बदल करतांना औषधी वनस्पतींची लागवड फायदेशीर ठरु शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कालीकत (केरळ) येथील सुपारी व मसाला विकास निदेशालय आणि पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, पुणे तसेच नवी दिल्ली येथील आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार कार्यक्रमाचे सहअध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई येथील निशांत ॲरोमाज प्रा.लि.चे संचालक डॉ. रमाकांत हरलालका हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक डॉ. दिगंबर मोकाट, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. विक्रम जांभळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार मार्गदर्शन करतांना म्हणाले औषधी वनस्पतींच्या जागतीक बाजारपेठेत 40 टक्के सहभाग भारताचा आहे. याचा फायदा जास्तीत जास्त शेतकर्यांना होण्यासाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये पीक व्यवस्थापन, मुल्यवर्धन आणि विपणन या गोष्टी महत्वाच्या ठरतील. या कार्यशाळेत सहभागी शेतकर्यांनी या कार्यशाळेचा फायदा घ्यावा. याचबरोबर संयोजकांनी औषधी आणि सुगंधी वनस्पती या विषयावर राज्यव्यापी कार्यशाळा घेण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सुचविले. याप्रसंगी डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. रमाकांत हरलालका यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते औषधी व सुगंधी वनस्पतींवरील प्रकाशनाचे विमोचन करण्यात आले. या दोन दिवसीय चर्चासत्रात सहभागी शेतकर्यांना औषधी वनस्पतीसंदर्भात विविध तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. विजू अमोलिक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम जांभळे यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उद्योजक असलेले नानासाहेब भोसले, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष व उद्योजक वैभव काळे तसेच या चर्चासत्रासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button