ठळक बातम्या

जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प आणून दाखवा; माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी खा. विखेंचा नामोल्लेख टाळून लगावला टोला

राहुरी | बाळकृष्ण भोसले : शिंदे- फडणवीस सरकार मध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना डावलून महसूल मंत्रीपद मिळविले. तुम्ही खासदार आहात. मोदी-शहांच्या जवळचे आहात. तर,  दुसऱ्याच्या चाळीस कोटींच्या कामाचे श्रेय कशाला लाटता. जिल्ह्यात एखादा दोन हजार कोटींचा प्रकल्प आणून दाखवा. त्या कामाचा खुशाल शुभारंभ करा. असा टोला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी नामोल्लेख टाळून खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना लगावला.
वांबोरी येथे जलजीवन मिशनअंतर्गत ४० कोटींच्या पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभप्रसंगी आमदार मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, बाजार समितीचे माजी संचालक सुरेश बाफना, उपसरपंच मंदा भिटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, एकनाथ ढवळे, किसन जवरे, कृष्णा पटारे, ॲड. ऋषिकेश मोरे, सचिन पटारे, प्रशांत नवले, संतोष कांबळे उपस्थित होते.
मागील आठवड्यात खासदार डॉ. विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी वांबोरी पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ केल्याने आमदार मुंडे यांनी वरील हल्लाबोल केला.‌ ते पुढे म्हणाले, वांबोरी गावाला आमदार तनपुरे यांनी ६५ कोटींचा निधी दिला आहे.  मंत्री पदावर विधानसभेत उत्तरे देतांना आमदार तनपुरे यांचा आत्मविश्वास दिसला. कुणाची तरी जिरवण्यासाठी स्वतःची जिरली तरी चालेल. असा प्रकार म्हणजे शिंदे- फडणवीस सरकार आहे. गावागावात खोक्यांची चर्चा आहे. हे टिकणार नाही. भविष्यात राष्ट्रवादीची सत्ता असेल.
आमदार तनपुरे म्हणाले, जलजीवन योजनेत केंद्र व राज्याची ५० टक्के भागीदारी असली. तरी, लोक प्रतिनिधी म्हणून मतदार संघातील प्रत्येक पाणी योजनांचे बारकाईने लक्ष देऊन प्रस्ताव तयार करून घेतले. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या. पाठपुरावा केला. योजनांना तांत्रिक, प्रशासकीय मंजूर्‍या घेतल्या. अशा कामांचा श्रेयवादाचा प्रकार चुकीचा आहे. वांबोरी-नगर रस्त्याचे काम केले. वांबोरी परिसरात एक कोटींची विद्युत रोहित्रे बसविली. जे केलं तेच हक्काने सांगतो. वांबोरी येथील विरोधकांना ऐकून घ्यायची सवय नाही. परंतु, यापुढे ऐकून घ्यावे लागेल, असेही तनपुरे यांनी सांगितले.
भिटे यांनी विरोधक ॲड. सुभाष पाटील यांच्यावर गावातल्या, दूध डेअरीच्या जमिनी विकल्या. नोटरीवर व्यवहार करून फसवणुकीचा धंदा केला. पतसंस्थेच्या ठेवी दिल्या नाही. अनेक लग्ने मोडली. त्यांनी ४० वर्षात गावात कोणतीही विकासकामे केली नाहीत, असे टीकास्त्र सोडले. यावेळी आमदार तनपुरे यांची पेढे तुला करून, जलकुंभाला जमीन देणारे बापूसाहेब गवते यांचा सत्कार करण्यात आला. पोखर्डी, जेऊर, पांगरमल येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Related Articles

Back to top button