ठळक बातम्या

राज्यात आदर्शवत ठरलेली बारागाव नांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला वर्षभरापासून ग्रहण

राहुरी शहर | अशोक मंडलिक : राज्यात आदर्शवत ठरलेली बारागाव नांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला गेल्या वर्षभरापासून ग्रहण लागलेले आहे. कधी पाईप लाईन फुटल्याने, वीज पुरवठा खंडित झाल्याने किंवा थकीत वसुलीसाठी अशा कोणत्या न कोणत्या कारणास्तव बंद राहणार्‍या पाणी योजनेचे ग्रहण संपता संपेनासे झाले आहे. महावितरण विभागाने वीज पुरवठा खंडित केल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी पुरवठा बंद झाल्याने संबंधित १५ गावांची पाण्यासाठी होरपळ सुरू झाली आहे.
बारागाव नांदूर पाणी योजनेवर बारागा नांदूर गावासह डिग्रस, राहुरी खुर्द, केदळ खुर्द, केंदळ बु. मांजरी, मानोरी, वळण, तांदूळवाडी, आरडगाव, शिलेगाव, तमनर आखाडा, पिंप्री चंडकापूर, देसवंडी आदी गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बारागाव नांदूर व इतर १४ गावांच्या पाणी योजनेवर आधारित आहे. स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या या योजनेने राज्यात आदर्श निर्माण केला होता. राज्यातील नफ्यात असलेल्या या पाणी योजनेचा सन्मान राज्यस्तरावर झाला.
दरम्यान, राज्य शासनाकडून मिळणारा देखभाल दुरूस्तीचा निधी गेल्या ४ वर्षांपासून थकीत आहे. सुमारे ७० लक्ष रूपये शासनाकडे थकीत झाल्यानंतर कोरोना कालखंडाने योजनेच्या वसुलीला ब्रेक लावले. कोरोना असल्याने लाभार्थी ग्रामस्थांकडे वसुली थकीत झाली. पाणी योजनेची मागिल काळातील ४४ लक्ष रूपये तर चालू वर्षाची ६७ लक्ष रूपये अशी एकूण १ कोटी १२ लक्ष रूपयांची थकबाकी वसुलीचे मोठे आव्हाण निर्माण झाले आहे. वसुली तसेच शासकीय अनुदान निधी लााभत नसल्याने पाणी योजनेचा वीज बिल थकीताचा आकडा वाढतच चालला आहे. महातिवरण विभागाची ९२ लक्ष ३६ हजार ३८० रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई झाली. दिवाळी सणातच पाणी योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनुसार महावितरण विभागाने वीज पुरवठा सुरळीत करीत दहा दिवसांची मुदत दिली होती.
परंतु पाणी योजनेकडून थकीत रक्कम भरली नसल्याचे कारण देत अखेर महावितरणने कारवाईचा फास आवळला. पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी बंद झाले आहे. मुळा धरणावर आधारित असलेल्या बारागाव नांदूर पाणी योजनेवरील संकट गडद झाले असून एकीकडे ग्रामस्थांकडून वसुली होत नसताना दुसरीकडे शासकीय अनुदान लाभेनासे झाले आहे. शासनाकडून देखभाल दुरूस्ती व पाणी योजनेचे अनुदान लाभत नसल्याने बारागाव नांदूर पाणी योजना पुन्हा संकटात सापडली आहे. याबाबत पाणी योजनेच्या अध्यक्षा विद्याताई गाडे, सचिव ग्रामसेवक बाळासाहेब गागरे, समन्वयक शौकत इनामदार यांसह सर्व सदस्यांची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. पाणी योजनेची थकीत वसुली, अनुदान याबाबत चर्चा होऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे यांनी दिली आहे.
गत सहा महिन्यांपासून बारागाव नांदूर पाणी योजना या ना त्या कारणावरून बंद राहत आहे. कधी पाणी पट्टी वसुलीसाठी पाणी योजना बंद ठेवली गेली. त्यानंतर मुळा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यानंतर तब्बल २० दिवसानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. त्यानंतर दिवाळी सणातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पुन्हा महावितरण विभागाने वसुलीचे हत्यार उपसल्याने वीज पुरवठा कोणतीही नोटिस न पाठवता बंद झाला. परिणामी पाणी योजना पुन्हा बंद झाल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button