अहमदनगर
राहुरी कृषी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पदव्युतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाने, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौव्हान, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. ढाकरे, उपकुलसचिव विजय पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या संविधान रॅलीमध्ये पदव्युतर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि हळगाव कृषी महाविद्यालयाचे सुमारे 300 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये संविधान दिनाच्या घोषवाक्यातून संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे पोहोचेल याचा संदेश देण्यात आला. यानंतर मुख्य प्रशासकीय इमारती समोर झालेल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. उत्तम चव्हाण यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेची सामूहिक शपथ दिली.
डॉ.महावीरसिंग चौव्हान यांनी संविधानाबद्दलची पार्श्वभूमी यावेळी विशद केली. याप्रसंगी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारताच्या थोर सुपुत्रांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी पदव्युतर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुजाता कांबळे हिने संविधानाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रेरणा भोसले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. कीर्ती भांगरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.