अहमदनगर

राहुरी कृषि विद्यापीठात माजी विद्यार्थी संघटनांचे संमेलन, परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे संकल्पनेतुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 16 ते 18 डिसेंबर, 2022 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्न कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन, परिसंवाद व प्रदर्शन आयोजीत करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा परिसंवाद व कृषि संबंधीत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून पदवी घेतलेल्या व स्वतःचा उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांनी या प्रदर्शनासाठी नावनोंदणी करावी. या परिसंवादामध्ये विविध कृषि उद्योजकांच्या यशोगाथांचा अनुभव घेता येणार आहे. या परिसंवाद व प्रदर्शनातून कृषिच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योगातील नवनविन संकल्पना बघता येणार आहेत. तसेच यशस्वी कृषि पदवीधर उद्योजकांबरोबर संवाद साधता येणार आहे. प्रदर्शनामध्ये एकाच दालनात कृषि निविष्ठा, कृषिमधील नविन संशोधन, कृषितील आधुनिक अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, रोपवाटीका तंत्रज्ञान इ. नविन तंत्रज्ञान शेतकर्यांना व विद्यार्थ्यांना बघण्यास मिळणार आहे.
या निमित्ताने कृषि पदवीधर कृषि उद्योजक यांना त्यांनी केलेले यशस्वी प्रयोग दाखविण्यासाठी कृषि विद्यापीठाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तरी या माजी विद्यार्थी संघटनेच्या संमेलन व प्रदर्शनासाठी जास्तीत जास्त कृषि पदवीधर उद्योजकांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button