ठळक बातम्या

तालुक्यात पावसाचे थैमान; पाच पंचवीस वर्षात असा पाऊस नाही पाह्यला

बाळकृष्ण भोसले | राहुरी  : गेल्या पाचपंचवीस वर्षात असा पाऊस नाही पाह्यला अशा प्रतिक्रिया आहेत जुन्या जाणत्या मंडळींच्या. गुरूवारी पहाटच्या पावसाने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले. ओढेनाले प्रवाह बदलते झाले तर सखल भागात गुडघाभर पाणी, शेतात तळे नि अनेक घरातही पाणी-पाणी ‘नको नको रे पावसा’ अस म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे.
गुरूवारी पहाटे वीजांचा प्रचंड कल्लोळ, ढगांचे भयावह कर्णकर्कश आवाज करत पावसाने कट्ट काळोखात आपले अनोखे रूप प्रथमच दाखवले. तुफान हजेरी लावत काही मिनिटातच शेतातून पाणी ओसंडून वाहाते होत ओढेनाल्यांनी रौद्र रूप धारण केले. ढगांच्या प्रचंड गडगडाटाच्या कर्णकर्कश आवाजाने घराघरात प्रचंड हल्लकोळ माजला. त्यात वीज गायब झाल्याने वातावरण अधिक भेसूर झाले. सुरूवातीला अर्ध्या पाऊण तासात तुफानच बरसले. सकाळी ८ वाजेपर्यंत कमी जास्त प्रमाणात हजेरी लावत होत्याचे नव्हते केले.
नगर-मनमाड महामार्गावरील ओढे पुर्ण क्षमतेने वाहाते झाल्याने पाणी रस्त्यावर आले व हा महामार्ग वाहतूकीसाठी आपोआप बंद झाला तर श्रीरामपूर-देवळाली हा मार्गही दुपारपर्यंत बंद होता. ग्रामीण भागातील बहुतेक प्रमुख जिल्हा व इतर रस्ते दुपारनंतर हळूहळू वाहतुकीसाठी खुले होत गेले. अचानक आलेल्या या पावसाने अतिक्रमित झालेल्या ओढ्यानाल्यांनी आपली पुर्वी वाहत असलेल्या सिमेची आठवण चाणाक्षपणे शेतकरी वर्गाला करून दिली. या सिमेरेषेच्या आत येवू नका हा जणू संदेशच त्यांनी तमाम जनतेला दिला आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते तर अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाल्याने व ओढेनाल्यांनी पात्र बदलल्याने अनेक ठिकाणी घरात तसेच जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले तर शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन पिकाचे ढीग या प्रवाहात वाहून गेले. पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने शेतजमीनी खरडून वाहिल्या तर ओढ्या शेजारील विहिरी पडल्या. पाण्याच्या प्रवाहाने अनेक ठिकाणी ग्रामीण रस्ते खचले, काही वाहून गेले तर पूल होते की नव्हते याचा मागमुसही मागे ठेवला नाही.
एकूणच धुव्वाधार पावसाने शेतजमीजीनी, त्यातील उभी पिके व रस्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संबंध तडाख्यात बोटावर मोजण्याइतपत ठिकाणी शासकीय यंत्रणा नजरेस पडली. ग्रामीण भागात शेजारी पाजारी एकमेकांना मदत करताना दिसले. झटक्यात आलेल्या संकटाने मात्र गावपण जपल्याची व टिकवून ठेवण्याची एकीची प्रचिती आली.

Related Articles

Back to top button