अहमदनगर

कृतज्ञता जपणे ही माणुसकीची प्रतिष्ठा होय – डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कृतज्ञता जपणे ही माणुसकीची प्रतिष्ठा असून त्यातूनच जग सुखी आणि संपन्न होईल असे विचार साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे माऊली वृद्धाश्रमात भोजन देणगी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहणी, सुयोग बुरकुले, अभिष्टचिंतन आणि विविध कार्यक्रमाचे नियोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वाघुंडे होते. संयोजक सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. वृद्धाश्रमास दोन हजार रुपयांचा चेक सौ. कल्पनाताई वाघुंडे आणि सुभाष वाघुंडे यांना प्रदान करण्यात आला. सुखदेव सुकळे यांनी सुयोग बुरकुले यांच्या तेविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व वृद्धांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सुयोग बुरकुले म्हणजे सेवाभावी युवाशक्ती असून ही पिढी आजच्या युवकांना प्रेरणादायी विचारधारा आहे. सुखदेव सुकळे यांचे म्हणजे माणुसकीची कार्यशाळा असून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले, करीत आहेत. सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी कठीण परिस्थितीत चालविलेला वृद्धाश्रम हे श्रीरामपुरातील एक सेवातीर्थ आहे. मंदिराची उभारणी करून येथे भक्ती, नीती, संस्कृती, जीवनगती आणि जगण्याची उर्मी वाढवत आहे, असे सांगून सुखदेव सुकळे, बुरकुले, वाडणकर परिवाराचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सुरेश बुरकुले, सौ.उज्ज्वला बुरकुले, बाजीराव मोटे, रामदास व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले.
सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी वृद्धाश्रमातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती नियोजन 07 सप्टेंबर 2022 रोजी असून त्यासाठी सर्वांनी यावे असे सांगितले तर सुखदेव सुकळे यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. सुभाष वाघुंडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून असे सेवाभावी कार्यक्रम हीच आमची प्रेरणा असून हे माणुसकीचे कार्य सुकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संकेत बुरकुले, आशिष बुरकुले, शुभम नाणेकर, सौ. सुरेखा बुरकुले, बुरकुले, सुकले परिवारासह माऊली वृद्धाश्रमातील स्त्रीपुरुष उपस्थित होते. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button