अहमदनगर

श्रीमती मीनाक्षी पाळंदे ‘उत्कृष्ठ शैक्षणिक सेवा कार्य’ पुरस्काराने सन्मानित

राहुरी | बाळकृष्ण भोसले – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा सन २०२२ चा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ शैक्षणिक सेवा कार्य गौरव पुरस्कार’ श्रीमती मीनाक्षी पाळंदे यांना सन्मानपुर्वक देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीमती मीनाक्षी श्रावण पाळंदे या राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असून येथीलच जिल्हा परिषदेच्या भटारकरवस्ती शाळेत उपाध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. गेली २९ वर्षे त्या अव्याहतपणे अध्यापनाचे सेवाकार्य करीत असून अध्यापनाबरोबरच शालेय परिसराची स्वच्छता, परिसरात वृक्ष लागवड व चिमुकल्यांचा सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठीचे त्यांचे काम सर्वश्रुत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञाननिष्ठ व आदर्शवत पिढी निर्मिती, व शालेय परिसर तंबाखू मुक्तीची त्यांची कामे निश्चितच वाखाणण्याजोगी आहेत. म्हणूनच भटारकरवस्ती शाळा तालुक्यात आदर्शवत राहण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कामाची दखल विविध सामाजिक संस्थांबरोबर पंचायत समिती स्तरावर घेतली गेली असून विविध पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. ज्ञानज्योती संस्थेनेही त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे व समाजसेवी आमदार निलेश लंके यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याने आणखी जबाबदारी वाढली असून यापुढील काळात आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असल्याचे तसेच शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळेतील सहशिक्षक, व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांचे सामुहिक योगदान व सहकार्य या पुरस्कारामागे असल्याचे श्रीमती मीनाक्षी पाळंदे म्हणतात.

Related Articles

Back to top button