कृषी
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत राहुरी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकर्यांच्या बांधावर
राहुरी विद्यापीठ : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ विविध तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतावर भेटी देवून मार्गदर्शन करीत आहेत.
मागील आठवड्यात वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागामार्फत मु.पो. लोणी प्रवरा, ता. राहाता तसेच मौजे सायंखिंडी, वडगाव लांडगा, जवळे कडलग ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथील दुर्गम भागातील शेतकर्यांच्या शेतावर भेटी देण्यात आल्या. यावेळी विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, डॉ. संजय कोळसे, प्रा. मधुकर शेटे व संगमनेरचे मंडळ कृषि अधिकारी पंकज कवाडे यांनी शेतकर्यांसमवेत चर्चा करुन मार्गदर्शन केले.
यावेळी द्राक्ष, आंबा, डाळिंब ही फळपिके व मका, बाजरी व सोयाबीन या पिकांच्या प्रक्षेत्रावर भेटी देण्यात आल्या. बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. विजय शेलार, डॉ. सुरेश झांजरे, डॉ. अनिल सुर्यवंशी, डॉ. नारायण मुसमाडे व डॉ. अविनाश कर्जुले या शास्त्रज्ञांच्या चमुने मु.पो. मानोरी, पाथरे खु. व पानेगांव, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील शेतकर्यांच्या शेतावर जावून सोयाबीन, कपाशी व पेरु बागेला भेटी देवून संबंधीत शेतकर्यांच्या समस्यांबाबत जाणून घेतले व त्यांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर राहुरी कृृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या पाडेगांव, ता. फलटण, जि. सातारा येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ भरत रासकर, डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. सुभाष घोडके, डॉ. सुरज नलावडे व डॉ. किरणकुमार ओंबासे यांनी मु.पो. आदर्कि बु., ता. फलटण, जि. सातारा व मु.पो. जळगांव, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील ऊस, टोमॅटो व कांदा तसेच सोयाबीन, आले या पिकांच्या प्रक्षेत्रावर भेटी देवून संबंधीत शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
याच उपक्रमांतर्गत विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाने दुर्गम, डोंगराळ व कोरडवाहू असलेल्या शिराळ, ता. पाथर्डी या गावाची निवड केली. कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, तुर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायख, तुर रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, पाथर्डीचे तालुका कृषि अधिकारी श्री. सुधीर शिंदे, मफुकृवि, राहुरीच्या कृषि अर्थशास्त्र विभागचे कृषि सहाय्यक जयदिप खळेकर व कृषि विभागाचे कृषि सहाय्यक राहुल आठरे या सर्व शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शिराळ, ता. पाथर्डी या गावातील शेतकर्यांच्या शेतावर संपूर्ण दिवस थांबून त्यांच्या समस्या व शेतीमधील अडचणी समजून घेतल्या.
यावेळी कृषि विद्यापीठ व कृषि विभाग शेतकर्यांसाठी कोणकोणत्या योजना व उपक्रम राबवित आहेत या संदर्भात शेतकर्यांना सविस्तर माहिती दिली. वरील सर्व गावांमध्ये माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत झालेल्या या विविध ठिकाणी भेटीसंदर्भात संबंधीत शेतकर्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले.