उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कृषि विज्ञान संकुलाचे भूमिपूजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मान्यता मिळालेल्या नाशिक जिल्ह्यातील मौजे काष्टी, ता. मालेगाव येथे सुरु असलेल्या कृषि विज्ञान संकुलच्या भव्य इमारतीचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कृषि व माजी सैनिक कल्याण व कृषि विज्ञान संकुलाचे प्रणेते आ. दादाजी भुसे उपस्थित होते. याप्रसंगी मालेगाव शहराचे आ. मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, नंदुरबार डॉ. सातप्पा खरबडे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी डॉ. विश्वनाथ शिंदे हे उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व आ. दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले व इमारत बांधकामासाठी कुदळ टाकून कामाचे पूजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान संकुलाच्या विकासाचे काम येथे सुरू आहे. तत्पूर्वी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी कृषि विज्ञान संकुलाचे महत्व व उद्ष्ट्यिे मान्यवरांना विषद केले. कृषि विज्ञान संकुलांतर्गत पाच कृषि संलग्न महाविद्यालयांना परवानगी मिळाली होती व त्यासाठी मौजे काष्टी, ता. मालेगाव येथे 622 एकर जमीन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे व त्यापैकी पहिले कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय 2020-21 मध्ये सुरू झालेले आहे.
या महाविद्यालयासाठी 40 विद्यार्थ्यांची मान्यता असून शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रत्येकी 40 विद्यार्थी संख्या असलेल्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्रातील पहिले कृषि तंत्र निकेतन (इंग्रजी माध्यम 3 वर्ष) या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली व हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शासनाने कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय यातील महाविद्यालयांना अनुक्रमे 60, 60 आणि 40 अशा विद्यार्थी संख्यानुसार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. भूमिपूजनाची सांगता झाल्यानंतर कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना देवरे, उपविभागीय कृषि अधिकारी, मालेगाव व डॉ. संजय पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी यांनी केले. कार्यक्रमाला कृषि विज्ञान संकुल येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button