कृषी

राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात राहुरी विद्यापीठाच्या वाणांचा ९० टक्के वाटा

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : राज्यामध्ये एकुण २०० साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांची वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी इतकी आहे. राज्यामध्ये ऊस लागवडीखाली १० लाख हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्र हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ विकसीत ऊस वाणांखाली आहे. या साखर कारखान्यांमध्ये अंदाजे १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १०-१२ लाख मजूर राज्यातील कोरडवाहू भागातून येत असतात. या मजूरांना वर्षातील सहा महिन्यांचा शाश्वत रोजगार उपलब्ध होतो. तसेच ऊस वाहतूकीसाठी लाखो ट्रका, ट्रॅक्टर, बैलगाड्या या साधनांचा ऊस वाहतूकीसाठी वापर होतो. एकुणच या साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागाचा विकास झालेला दिसून येतो. असे हे कारखाने फायद्यात आणायचे असतील तर या कारखान्यांना उसाचे चांगले संशोधीत वाण जे अधिक उत्पादन आणि अधिक उतारा देतील अशा वाणांची आवश्यकता असते. हा ग्रामीण भागाचा आर्थिक गाडा सक्षमपणे चालविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील निर्मित ऊस वाण महत्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यातील ऊस कारखान्यांचे बॉयलर हे या प्रगत वाणांमुळेच सुरु आहेत. आत्तापर्यंत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधनातून ऊसाचे अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १४ वाण प्रसारीत केले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकुण उसाच्या क्षेत्रापैकी सन २०१९-२० मध्ये को ८६०३२ या वाणाखाली ४८.४९ टक्के क्षेत्र, फुले २६५ या वाणाखाली ३४.२२ टक्के क्षेत्र, फुले १०००१ या वाणाखाली ४.१७ टक्के क्षेत्र, को ९२००५ या वाणाखाली ३.६७ टक्के क्षेत्र असे एकुण ९०.५५ टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या वाणांखाली आहे. या वाणांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना रु. १३२४६८ कोटी दिले आहे. 

‌   सन २००९ पूर्वी उसाखालील क्षेत्र कमी झाले होते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याच्या अति वापरामुळे उसाखालील जमिनी क्षारपड होवून नापीक झाल्या होत्या. याचा परिणाम साखर उत्पादन आणि अप्रत्यक्षरीत्या साखर कारखान्यांवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि कामगार वर्गावर झाला होता. परंतु, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसीत केलेले फुले २६५ या वाणाने या क्षारपड जमिनीमध्ये ऊस उत्पादनात क्रांती केली. यामुळे क्षारपड जमिनीसुध्दा चांगले उत्पादन देवू लागल्या. याचा परिणाम ऊस आणि साखर उल्पादनावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील ऊस संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या केंद्राने विकसीत केलेल्या ऊस वाणांखालील महाराष्ट्रात ९० टक्के क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील शेतकर्यांची आर्थिक प्रगती झाली असून महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे.
– कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
आजपर्यंत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शेतकर्यांसाठी उसाचे १४ उन्नत वाण आणि १०२ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत केलेल्या आहेत. या विकसीत वाणांमुळे ऊस उत्पादकांमध्ये आर्थिक स्थैर्य आलेले आहे. म्हणुनच या संशोधन केंद्राचे कार्य दिशादर्शक आहे. 
 – डॉ.शरद गडाख, संशोधन संचालक  
 यापूर्वी सन १९९६ साली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधीत केलेला को ८६०३२ हा वाण मध्यम उशिरा पक्व होणारा, अधिक उत्पादनक्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोग व कीड प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करणारा, पूरबूडीत क्षेत्रात तग धरणारा आणि अनेक खोडवे देवू शकणारा वाण शेतकर्यांच्या व कारखान्याच्या पसंतीस पडला आहे. या व्यतिरिक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले फुले १०००१, को ९२०५ या उसाच्या वाणांखाली क्षेत्र वाढत आहे. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने गेल्या ८८ वर्षात ऊस संशोधनाचे भरीव कार्य केले आहे. या केंद्राद्वारे राज्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गरजेनुसार ऊसाच्या प्रसारीत जातींचा अनुवंशीकदृष्टया शुध्द मुलभूत बियाणे हे पायाभुत बेणे निर्मितीसाठी देण्यात येते. 
 – डॉ. भारत रासकर, ऊस विशेषज्ञ  
कमी साखार उतारा असला तर कारखाना चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणुनच महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले उसाचे वाण साखर कारखान्यांना संजीवनी ठरत आहे. उसाच्या या वाणांमुळे शेतकर्यांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती उंचविण्यास मदत झाली आहे. काही शेतकर्यांनी त्यांच्या घरांना ऊस वाणाचे नांव दिलेले आहे. असे अनेक उदाहरणे आहेत की या ऊसाच्या वाणांमुळे शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. या ऊस वाणांमुळे शेतकर्यांच्या जीवनात गोड क्रांती आली आहे. राज्यातील साखर कारखाने जे सुरु आहेत हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या ऊस वाणांमुळेच नफ्यात आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.

Related Articles

Back to top button