अहमदनगर

शिर्डी येथील नवीन वसविणाऱ्या शहरास उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय करून “शिर्डी” नवीन जिल्हा करा- भाऊसाहेब वाकचौरे

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : शिर्डी विमानतळ जवळ नवीन वसविणाऱ्या शहरास उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय करून “शिर्डी” म्हणून नवीन जिल्हा करण्यात यावा. या जिल्ह्याचा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून विकास करावा अशी मागणी भाजपा सोशल मिडिया सेलचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे पाठवलेले निवेदनात केली आहे.
वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर वसविण्याचे घोषणा केली. याबाबद प्रथमतः आपले हार्दिक अभिनंदन..! अतिशय सुंदर व चांगला उपक्रम आपण घेतला आहे. हि नवीन कल्पना आपणास सुचली याबद्द्ल आपले मनपूर्वक धन्यवाद..! या शहरास नवी मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर नवी शिर्डी असे नाव द्यावे. अहमदनगर जिल्हा हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा आहे. १७४१३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असणारा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात वसलेला उत्तर महाराष्ट्रात असणारा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भौगोलिक महसुली विभागाचे सरहद्दीवर व सात जिल्ह्यांच्या हद्द असलेला जिल्हा आहे. यामुळे महसूल, पोलीस अथवा इतर प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्याला मुहूर्त काही मिळत नाही. आपण नवीन शहर वसविण्याचे घोषित केले त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल. हे शहर निर्माण करताना जिल्हा मुख्यालय साठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करता येतील आपण नवीन जे शहर वसविण्याचे ठरविले आहे ते कोपरगाव, राहता, संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असेल. जिल्ह्यासाठी अग्रेसर असणारे श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव या तालुक्याचे पासून सारख्या अंतरावर म्हणजे ३०किमी वर तर नेवासा ६५ किमी व अकोले ५५ किमी व राहता १० किमी अंतरावर हे नवीन शहर होईल. जिल्ह्याची हद्द १०० ते ११० किमी अंतराच्या आत राहील. प.पु. साईबाबांच्या समाधी मुळे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असणारे व लोकसभा मतदारसंघाला नाव असणारे ” शिर्डी ” असे नाव या जिल्ह्याला देण्यात यावे. नवीन जिल्हा शिर्डी विमानतळा जवळ होणार असून दौंड मनमाड रेल्वे मार्ग जवळ आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळ असून समृद्धी महामार्ग येथून आहे. उत्तर दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग येथून जातो. शिवाय प्रस्तावित सुरत – चेन्नई राष्ट्रीय महामार्ग येथून जाणार आहे. यामुळे हवाई, रेल्वे, भूमार्ग च्या दृष्टीने परिपूर्ण जिल्हा असेल.

हा पर्यटन समृद्ध जिल्हा होईल. कळसुबाई, हरिश्चंद्र, बाळेश्वर डोंगर रांगाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोदावरी, प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी नद्यांच्या खोऱ्यात सहकार, कृषी, शिक्षणाने परिपूर्ण असलेला देव, देवता, साधू संत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला, छत्रपती शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्या वास्तव्याने पावन झालेले गडकोट किल्ले असा समृद्ध जिल्हा नावलौकिकास प्राप्त जिल्हा होईल.

नवीन जिल्ह्यात पर्यटन म्हणून अतिशय महत्वाचे स्थळे आहेत. शिर्डी हे साईबाबांच्या समाधी मुळे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. शनिशिंगणापूर हे शनी महात्म्य व वैशिष्ट्यपूर्ण मुळे जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. नेवासा येथील पैस खांब ज्ञानेश्वरी लिहिण्यामुळे महाराष्ट्र राज्यातील भाविक भेट देतात. अगस्ती ऋषी ज्यांना दक्षिण भारतात देव मानतात त्यांचा आश्रम अकोले येथे आहे. स्वप्नात राज्यदान करणारा राजा हरिश्चंद्रची नगरी अकोले तालुक्यात आहे. तेथील महादेवाचे मंदिर, कोकणकडाचे दृश्य विलोभनीय आहे. अखंड हरिनाम सप्ताह मुळे सरला बेट हे श्रीरामपूर तालुक्यात आहे. कोपरगाव तालुक्यात चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव महाराज यांची पुणतांबा येथे समाधी आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची समाधी कोपरगाव जवळ आहे. तसेच दैत्यगुरु शुक्राचार्य, देवयानी व कच यांचे वास्तव असलेला परिसरही हाच आहे. आत्मा मलिक ध्यानपीठ असलेले जंगली महाराज आश्रम शिर्डी जवळ आहे. दत्त देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले देवगड हे नेवासा तालुक्यात आहे. रतनवाडी ता अकोले येथे प्रवरा नदीचे उगमस्थान असलेले अमृतेश्वर हे अकराव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर अदभुत शिल्पकलेचा नमुना आहे.संवत्सर ता कोपरगाव येथील चक्रधर स्वामी मंदिर महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान आहे. आदिवासी समाजाचे कुलदेवता घोरपडा देवी रंधा ता अकोले, भिल्ल समाजाची कुलदेवी येडुं माता पिंपळदरी ता अकोले, कासार समाजाची कुलदेवी कालिकामाता कसारे ता संगमनेर येथे आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे अकोले तालुक्यात असून जवळच इंग्रजकालीन भंडारदरा धरण असून त्यावर असणारा अँब्रेला फॉल, रंधा फॉल असे निसर्गाचे आविष्कार असून काजवा व फुल मोहोत्सव येथे होतात. संधान दरी साम्रद हे आशिया खंडातील निसर्गाचा चमत्कार आहे. याच परिसरात नेकलेस फॉल, न्हाणी धबधबा, नाना नाणी धबधबा असे नयनमनोहर दृश्य आहेत. तामकडा चंदनापूरी घाट संगमनेर, तवा धबधबा सावरगाव पाट, मालदड ता संगमनेर येथिल धबधबा हे ही आहेत. पेमगिरी ता संगमनेर येठे महाकाय व पुरातन वटवृक्ष आहे. कोकणकडा, लवण स्तंभ, कात्राबाई खिंड, असे अनेक ठिकाण आहेत जे पर्यटक आकर्षित होतात. प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी, कच, कृष्णावंती, कुरकुंडी या नद्यांचे उगमस्थान व भंडारदरा, निळवंडे, देवठाण, अंबित, पिंपळगाव खांड, कोटमारा, वाकी, असे अनेक छोटी मोठी धरणे आहेत.

गडकोट किल्ले छत्रपती शहाजीराजे यांनी स्थापन केलेले राज्याची पहिली राजधानी भीमगड ( शाहगड ) पेमगिरी ता संगमनेर, छत्रपती शिवाजीराजे यांच्या वास्तव्याचा विश्रामगड पट्टाकिल्ला, क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा रतनगड, हरिश्चंद्र गड, भैरवगड, मदनगड, अलंगगड, मलंगगड, कुलंग गड, कुंजरगड, आजोबा गड, पाथर गड, औंढा गड, घनचक्कर गड, कलाड गड, बितनगड असे किल्ले आहेत.

नवीन शहरास नवी शिर्डी नाव देऊन उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय करावे. पर्यटन जिल्हा म्हणून विकास करावा, या मागणी संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन जिल्ह्याची मागणीची दखल घेत नगरविकास खात्याला प्रस्ताव पाठविला आहे. या बाबतचा ई-मेल भाऊसाहेब वाकचौरे यांना प्राप्त झाला आहे.

या परिसरात सहकार ची मुहूर्तमेढ रोवली असून पदमश्री विठ्ठल विखे पाटील यांनी पहिला साखर कारखाना काढला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगमनेर, कर्मवीर शंकरराव काळे कोळपेवाडी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी कोपरगाव, लोकनेते मारुतीराव घुले नेवासा, अगस्ती, मुळा, अशोक, गणेश असे साखर कारखाने आहेत. अनेक दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. मुळा प्रवरा वीज वितरण कंपनी, सहकारी सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था,चे जाळे असून उसाबरोबर भाजीपाला, तांदूळ, बाजरी, गहू ही पिके घेतली जातात. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता येथे नगरपालिका तर शिर्डी, अकोले, नेवासा येथे नगरपंचायत आहेत. तरी नवीन तयार होणारे शहर हे उत्तर नगर जिल्ह्याचे केंद्र करून शिर्डी हा नवीन जिल्हा करून पर्यटन जिल्हा म्हणून त्याचा विकास करावा. असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, माजी मंत्री, विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, अण्णासाहेब म्हस्के, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार लहू कानडे, माजी खासदार यशवंतराव गडाख, भाऊसाहेब वाकचौरे, माजी वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, अशोकराव काळे, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button