कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे घेवडा पिकाच्या वरुण व फुले राजमा या वाणांना शेतकर्यांची पसंती

राहुरी विद्यापीठ / प्रतिनिधीमहात्मा फुले कृषि विद्यापीठातंर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथून विकसीत केलेले घेवडयाचे ‘ वरुण’ आणि ‘ फुले राजमा’ हे कडधान्य पिकाचे वाण शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हयांमध्ये या पिकाखाली 50,000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. कमी कालावधीत अधिक उत्पादनक्षमता असणार्या या वाणांचे सातारा जिल्हयातील कडधान्य पिकांतर्गत क्षेत्र 30,000 हेक्टर असून पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाडयातील बीड जिल्हयामध्ये या वाणांचे क्षेत्र वाढत आहे. या क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या ‘ वरुण’ व ‘ फुले राजमा’ या वाणाखाली आहे. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला प्रचलीत ‘ वाघ्या’ हा वाण मोठया प्रमाणात घेतला जात होता. परंतू या वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम आणि बाजारभाव मिळवून देणारा ‘ वरुण’ हा वाण विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथून 2001 मध्ये प्रसारीत करण्यात आला आणि काही वर्षातच वाघ्या वाणाचे क्षेत्र वरुण वाणाने व्याप्त केले. वरुण हा कमी कालावधीत म्हणजे 70 ते 75 दिवसात येणारा, मध्यम ते हलक्या जमिनीत कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारा वाण आहे. फिकट पांढ-या रंगाच्या दाण्यावर तपकिरी रंगाची छटा असणार्या या वाणामध्ये प्रथीनाचे प्रमाण 23.30 टक्के व कार्बोदकाचे प्रमाण 61.00 टक्के आहे. हा वाण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतला जात असल्याने लागवडीखालील क्षेत्र प्रकर्षाने वाढलेले दिसून येते.     
 ‘ फुले राजमा’ हा वरुण वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम असणारा वाण वाघ्या आणि जीआरबी-9710 या वाणांच्या संकरातून 2017 मध्ये प्रसारीत करण्यात आला. या वाणाचा कालावधी 80 ते 82 दिवसाचा असून प्रथिनाचे प्रमाण 23.38 टक्के व कार्बोदकाचे प्रमाण 63.93 टक्के इतके आहे. मर आणि विषाणूजन्य रोगास मध्यम प्रतिकारक्षम असणारा व फिक्कट पांढर्या रंगाच्या दाण्यावर आकर्षक गुलाबी रंगाची छटा असणार्या या वाणास वरुण वाणापेक्षा चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या वाणाखालील क्षेत्रसुध्दा वाढत आहे.  
महाराष्ट्रामध्ये कमी कालावधीत अधिक उत्पादनक्षमता असणार्या या पिकाची सरासरी उत्पादकता 11 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे. रब्बी हंगामात पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाण्याच्या तीन पाळया दिल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकास रुपये 6,000 ते 7,000 प्रति क्विंटल दर मिळत असल्याने हे पीक शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Related Articles

Back to top button