कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची युवा उद्यान पंडित राहुल रसाळ यांच्या हवामान अद्ययावत शेतीला भेट

राहुरी विद्यापीठ/ प्रतिनिधीहवामान बदलाचा अभ्यास करून पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या उदिष्टानुसार हवामान अद्यावत विविध तंत्रज्ञानप्रणाली विकसित करून ती शेतकर्यापर्यंत पोहोचविणे व नाविन्यपूर्ण प्रयोगातून शेती उत्पादन घेत असणार्या प्रयोगशील शेतकर्यांच्या शेतीला भेट देऊन त्या बाबींचा अभ्यास करणे या करिता एक दिवसीय अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. 


या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील युवा उद्यान पंडित राहुल रसाळ यांच्या प्रयोगशील शेतीस भेट देऊन त्यांनी अवलंबलेल्या नाविन्यपूर्ण शास्त्रीय आधुनिक शेती पद्धती जाणून घेतल्या. या अभ्यास दौर्यात प्रकल्पातील एकूण 15 शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, प्रकल्पाचे खरेदी अधिकारी डॉ. अतुल अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री राहुल रसाळ यांचा कल हवामान अद्ययावत सेंद्रिय शेती करण्याकडे असून ते द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. यामध्ये फळ पिकांना स्लरी देण्यासाठी ट्रक्टरचलित स्लरी यंत्र स्वतः तयार केले आहे. त्यांची संपूर्ण शेती हि ठिबक सिंचनाखाली असून द्राक्ष बागेत सबसरफेसचा वापर करण्यात आलेला आहे.

ते शेतीमध्ये कारले, करटोली, ढोबळी, टोमॅटो भाजीपाला पीक बिगर हंगामी घेण्यावर भर देतात. तसेच त्यांनी स्वतःची जीवाणू प्रयोग शाळा व हवामान केंद्र उभारले असून यामध्ये विविध संवेदक (सेन्सर) चा वापर केला आहे. यात प्रामुख्याने स्वयंचलित हवामान केंद्र, इ.टी. गेज मिटर, पी. एच. आणि इ. सी. सेन्सर यांचा वापर करण्यात आलेला आहे. फवारणीकरिता परदेशी बनावटीचा इलेक्ट्रोस्टॅटिक ब्लोअरचा वापर करतात यामुळे किडनाशकाची 40 टक्के पर्यंत बचत होत असल्याचे सांगितले. फवारणीसाठी आर. ओ. पाण्याचा वापर करतात त्यासाठी त्यांनी आर. ओ. प्लान्ट उभारला आहे. भेटी दरम्यान शेती बाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अभ्यास व अनुभव याची योग्य सांगड घालून नव नवीन प्रयोग केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते. कृषी उत्पादन घेताना ते अंश रहित निर्यातक्षम दर्जाचे असावे याकडेही लक्ष दिले पाहिजे असे मत राहुळ रसाळ यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button