कृषी

बालानगर येथे तहसिलदार शेळके यांनी बांधावर जाऊन केली ई-पीक पाहणी

     
माझी शेती माझा सातबारा मोहिमेंतर्गत तहसिलदार चंद्रकांत शेळके प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करताना. याप्रसंगी तलाठी रमेश फटांगडे, शेतकरी भास्कर गोर्डे सह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

विलास लाटे/पैठण : माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमेंतर्गत बालानगर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष ई-पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ‘माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे  यांच्या मार्गदर्शनात पैठण तालुक्यातील प्रत्यक्ष शेतावरील बांधावर जाऊन ई-पीक पाहणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी २६ ऑगस्ट रोजी बालानगर येथील प्रगतिशील शेतकरी भास्कर गोर्डे यांच्या शेतातून केली. यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरून पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कसे अपलोड करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन स्वत: तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. संबधित शेतकऱ्यांचा पीक पेरा प्रत्यक्ष शेतात भरून घेतला. पैठण तालुक्यातील सर्वच गावामध्ये ई- पीक पाहणीची सुरुवात झाली असून, स्वत: तहसीलदार यांनी शेतकरी भास्कर गोर्डे यांच्या बांधावर जाऊन ऑनलाईन पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी शैलेश जोशी,निहालसिंग बहूरे, तलाठी रमेश फटांगडे, चंद्रकांत काळे, रविंद्र साळवे, सुचिता मेघरे, गुलाब थोरात, कृषी सहाय्यक डि जी भवर,आर एन दहिसर व शेतकरी अनंत गोर्डे, बद्रीनाथ गोर्डे, हनुमान घोंगडे, योगेश गोर्डे सह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधून आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पिकाची परिस्थिती, बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेऊन त्यांचे छायाचित्र अपलोड करू शकतात. संबंधित तलाठी यांचे लॉगिनवरून त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत करण्यात येते.

.

  

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button