कृषी

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे गरजेचे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी | जावेद शेख : माती व पाणी हे शेतीमधील महत्वाचे घटक आहेत. परंतु रासायनिक खतांचा असंतुलीत तसेच अतिवापर यामुळे माती व पाण्याचे आरोग्य मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. शेतकर्यांनी माती व पाणी परिक्षण करुनच खतांचा संतुलीत वापर करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरुन मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल व पर्यायाने आपलेही आरोग्य चांगले राहिल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मृदविज्ञान विभागामार्फत माती व पाणी परिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम दि. 11 ते 15 मार्च, 2024 या कालावधीत आयोजीत करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. बी.एम. कांबळे, डॉ. महाविरसींग चौहान, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. विजय पाटील व प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. गणेश शेळके उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की माती परिक्षण हे पिकांच्या उत्पादकतेशी संबंधीत आहे. त्यामुळे मातीमधील खते व मुलद्रव्यांची कमतरता लक्षात येते. त्यानुसार खतांचे नियोजन करणे सुलभ होऊन खतांवर होणारा खर्च कमी होतो. शेतकर्यांनी जमिन आरोग्य पत्रिकेंचा वापर काटेकोरपणे करण्याचे आवाहन यावेळी बोलतांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी.एम. कांबळे यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. यावेळी नाशिक येथील जिल्हा सर्वेक्षण अधिकारी संदिप वळवी व श्रीमती अर्चना संकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ. गणेश शेळके यांनी तर सूत्रसंचालन कु. सायली बिरादार यांनी केले.

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी/ कर्मचारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचारी, खाजगी माती परिक्षण प्रयोगशाळा यांचे अधिकारी व कर्मचारी असे एकुण 22 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button