शाळेने दिलेले संस्कार जीवनभर जपावेत – सुलोचनाताई पटारे
शिरसगाव विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात. आपल्याला यापुढे गुणवत्ता सिद्ध करायची आहे. हजारो वर्षांपासून आपली संस्कृती टिकून आहे. आपल्या शाळेने जे संस्कार दिले ते जीवनभर जपावेत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उप शिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे यांनी केले.
स्व.खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव येथील १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्व.खा.गोविंदराव आदिक, स्व.जी के पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी फार कष्ट घेतले आहे. विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण महत्वाचे आहे. आपल्या आयुष्याच्या परीक्षेत आपण धैर्याने, आत्मविश्वासाने सामोरे जावे, यश आपलेच आहे. त्यासाठी जिद्दीने चिकाटीने आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. शेवटी १० वी चा परीक्षा फॉर्म भरलेला एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी प्राचार्या विमल पटारे यांनी सांगितले की जगात सर्वात शक्तिशाली आपले आई वडील आहेत. यशस्वी होण्यासाठी आई वडिलांची आवश्यकता असते. त्यामुळेच पुढे जाऊ शकतो. या शाळेने जे ज्ञान दिले आहे त्याचा उपयोग करून परीक्षा द्या व यशवंत व्हा.
यावेळी प्राचार्या सुमती औताडे, विश्वनाथ बडाख, उषा जगताप, संजय शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व आठवणी सांगितल्या. यावेळी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिलीप गवारे यांनी केले.