कृषी

शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळीपालनावरील एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत संगमनेर केंद्रातील सावरगावतळ येथे शेळीपालकांसाठी शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमप्रसंगी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे, प्रक्षेत्र गणक प्रवीण फटांगरे, रमेश कल्हापुरे व महेंद्र वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विष्णू नरवडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शेळीपालकांनी विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळीपालन व्यवसाय शाश्वत करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन व्यवसाय म्हणून केल्यास त्यापासून शाश्वत उत्पादन शक्य आहे. खास करून शेळीपालकांना शाश्वत व व्यावसायिक शेळीपालनासंबधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असावी व नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी ह्या हेतूने प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरच्या प्रशिक्षणात एकूण 30 प्रशिक्षणार्थीनी भाग घेऊन लाभ घेतला आहे. डॉ. विष्णू नरवडे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पैदास, आहार व उपयुक्त झाडपाला, आरोग्य व्यवस्थापन तसेच शेळीच्या दुधाचे गुणधर्म यासंबधी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना निविष्ठा व प्रशिक्षण पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संदीप पवार, रमेश कल्हापुरे, अजय गुलदगड, महेंद्र वाघमारे, किरण वाघमारे, प्रवीण वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button