अहमदनगर

राष्ट्रीय एकात्मिता व चारित्र्य जपणे महत्त्वाचे – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू कर्नल कमांडन्ट डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले की देशाने गेल्या 74 वर्षांमध्ये तंत्रज्ञान, विज्ञान, कृषि व औद्योगिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. यामध्ये सर्वांनी योगदान दिले आहे. सन 2047 मध्ये देशाची लोकसंख्या 166 कोटी होईल त्यावेळी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दिवसेंदिवस कमी होणार्या जमीन क्षेत्रामुळे अन्नधान्य पुरवणीचे कृषि क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने कृषि विद्यापीठांचे मोठे योगदान असणार आहे. बदलत्या वातावरणात तग धरणारे पिकांचे वाण विद्यापीठाने विकसीत केले आहे.

सध्या आपल्या कृषि विद्यापीठामंध्ये 51 टक्के रीक्त जागा असून 50 टक्के मनुष्यबळावर विद्यापीठ शिक्षण, संशोधन व विस्तारामध्ये उत्कृष्ट काम करत आहे. असाच कामाचा ध्यास ठेवून आपले विद्यापीठ देशात अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न करु या. विद्यार्थी हा राष्ट्राचा कणा असून तो अधिकाधिक विकसित होण्यासाठी विद्यापीठाने गेल्या वर्षी 97 विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या संशोधनाच्या कक्षा वृंदावल्या आहेत. वैयक्तिक चारित्र्य प्रमाणे राष्ट्राविषयी प्रेम असणे व राष्ट्रीय एकात्मिताा जपणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले.

या कार्यक्रमाला संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके, एन.सी.सी. ले. डॉ. सुनिल फुलसावंगे, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी ले. डॉ. फुलसावंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले व युध्दाचे प्रात्येक्षिक दाखविले. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण कार्यालय, पदव्युत्तर कृषि महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button