अहमदनगर

चांगले विचारच जीवन परिपूर्ण बनवतात – राजयोग शिक्षिका ब्रम्हाकुमारी शीतल दिदी

राहुरी विद्यापीठ : रात्री झोपतांना व सकाळी लवकर उठल्यानंतर नेहमी मनामध्ये चांगले विचार ठेवा. जागृत अवस्थेत चांगली स्वप्ने पहा. त्यामुळे तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक परिवर्तन होईल. स्पर्धा नेहमी स्वतः बरोबर करा. जगातील कुठलेही तंत्रज्ञान आपल्या मनाला शांती देवू शकत नाही. यासाठी चांगल्या विचारांची गरज असून तेच चांगले विचार आपल्या जीवनाच्या इमारतीची प्रत्येक वीट बनून आपले जीवन परिपूर्ण बनवेल असे प्रतिपादन पुणे येथील जगदंबा भवनच्या राजयोग शिक्षिका ब्रम्हाकुमारी शीतल दिली यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तीमत्व विकास उपक्रमांतर्गत राष्ट्रीय युवा दिवसाचे आयोजन आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालय यांच्या वतीने नानासाहेब पवार सभागृहात तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रम्हाकुमारी शीतल दिदी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरविद्या शाखा जलसिंचन विभाग प्रमुख व या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महानंद माने हे होते. याप्रसंगी राहुरी येथील प्रजापीता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमुख ब्रम्हाकुमारी नंदा दिदी, सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, प्रा. जितेंद्र मेटकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री व इंग्लीश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती आठरे उपस्थित होत्या.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. महानंद माने म्हणाले की आपल्या व्यक्तीमत्व विकासात आपल्या मनाची शक्ती खुप महत्वाची आहे. स्वामी विवेकानंदांसारखे बनने हे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थीनींचे स्वप्न असले पाहिजे तरच ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. यावेळी जितेंद्र मेटकर आपल्या भाषणात म्हणाले की स्वामी विवेकानंदांचे सर्व गुण आपल्या अंगात येवू शकणार नाहीत परंतु काही ठरावीक गुणांच्या आधारे आपण स्वतः सामर्थ्यवान बनू शकतो. ध्यानाद्वारे येणार्या एकाग्रतेने जगातील कुठलीही गोष्ट आपण साध्य करु शकतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब भोसले, स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महानंद माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॠतीका बुरांगे हिने तर आभार अंकीता पवार हिने मानले.

या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी तसेच सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी वसतीगृहाच्या उपकुलमंत्री डॉ. रीतु ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button