वाहतुकीचे नियम पाळूया, अपघाताला पूर्ण विराम देऊया – प्रादेशिक परिवहन अधिकारी गोसावी
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे विद्यार्थी - पालक मेळावा प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन
राहुरी : मुलं हे देवा घरचे फुल असतात. आजचे लहान मुल हे भावी नागरिक आहे, ते देशाचे भविष्य आहे. संगोपन आणि शिक्षण देत असताना आपल्या लहानग्यां विद्यार्थ्यांची घरापासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून ते आपल्या घरापर्यंत प्रवास करत असताना तो कशा पद्धतीने होतोय याकडे आपण एक ‘पालक’ या नात्याने आपले आद्य कर्तव्य असल्याचे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील गोसावी यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले मुलं शाळेत जात असताना ते ज्या बसमध्ये, गाडीमध्ये प्रवास करतात, ती बस सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असली पाहिजे. ती गाडी ही मुदत बाह्य झालेली नसावी. तिचे विमा आणि इतर सर्व बाबींनी परिपूर्ण असली पाहिजे. चालक हा निर्व्यसनी असायला हवा तसेच मोटरसायकल वरून शाळेपर्यंत प्रवास करताना पालकांनी देखील हेल्मेटचा जरूर वापर करावा. प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलणे टाळावे.
तसेच शाळेच्या वेळेपूर्वीच दहा-पंधरा मिनिटे अगोदरच पोहच होईल अशा बेतात आपण घरून निघावे म्हणजे रस्त्यांनी जाताना घाई गडबड होणार नाही. पर्यायाने अपघात देखील होणार नाही आणि वाहतुकीचे सर्वच नियम हे सर्वांसाठीच आणि आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच बनवलेले असतात. त्याचे पालन करावे, जेणेकरून आपले आणि आपल्या लहान विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही आणि हे सर्व नियम पाळल्याने आपल्या लहान बालकांवर देखील त्याचे सुसंस्कार हे लहानपणा पासूनच होईल त्यातून ते धडा घेतील.
तसेच विद्यार्थ्यांनी बसमध्ये प्रवासादरम्यान विनाकारण ड्रायव्हिंग केबिनमध्ये प्रवेश करत जाऊ नये. सर्व विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढ उतार करत असताना हळुवारपणे करावे. खिडकीतून कधीही हात बाहेर काढू नये तसेच चालत्या गाडीमध्ये धिंगाणा मस्ती करणे टाळावे असे आवाहन सोमवार दि. ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी तालुक्यातील वरवंडी येथील विजय मेहेत्रे यांच्या वस्तीवर दीपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला आयोजीत केलेल्या विद्यार्थी-पालक मेळाव्या प्रसंगी श्रीरामपूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील गोसावी यांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर विभागाचे मोटार वाहन निरीक्षक धीरज भामरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नर्सरी असो. उपाध्यक्ष अशोक उंडे हे होते. या मेळाव्याकरीता सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, राहुरी येथील ज्ञानगंगा विद्यालय, बाल विद्या मंदिर यांनी आपला सहभाग नोंदवला होता. बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच यादरम्यान ज्ञानगंगा विद्यालयाचा विद्यार्थी शार्दुल पाखरे, वेदिका काळे व संस्कृती सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भगवान श्रीकृष्ण हे जसे अर्जुनाच्या रथाचे सारथी होते त्याप्रमाणेच विजय हा विद्यार्थ्यांच्या रथाचा म्हणजे गाडीचा सारथी आहे. त्याप्रमाणेच विजय देखील या निरागस, बालक, विद्यार्थी याना आपली मुलं समजून काळजी घेतो ही बाब येथे महत्वाची आहे. मुलं ही आपली लाख मोलाची दौलत आहे. त्यांना सुरक्षितपणे प्रवास करता येतोय त्याला म्हणून त्यांनी यापुढे देखील अशीच सेवा देत राहो. मेहेत्रे कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असते त्याच धर्तीवर त्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचे मी आभार मानतो.
_कृषिभूषण सुरसिंग पवार.
तसेच राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.गोरे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य खेत्री, तुपविहीरे, श्रीमती. खळेकर मॅडम, ज्ञानगंगा विद्यालयाचे श्री.मिसाळ, बाल विद्यामंदिरचे आदर्श शिक्षक श्री. रासकर, तसेच श्री शाहू विद्यामंदिर खडांबे येथील सेवानिवृत्त ह.भ.प. भाऊसाहेब खळेकर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नर्सरी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक मुंडे, युवा उद्योजक बंटी आडसुरे, गोरक्षनाथ आडसुरे, कृषी भूषण सुरशिंग पवार, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, कार्यालयीन अधीक्षक सुनील सरोदे, महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त राजेंद्र मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक श्री.मेहत्रे यांनी खडांबे, नांदगाव, शिंगवे, वरवंडी, बाभुळगाव ठिकाणाहून पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व यापुढे अधिक चांगली सेवा देत असतानाच बस मध्ये कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक तसेच पालक यांना स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. म्हणून दिवाळी सदिच्छा भेट म्हणून विद्यार्थ्यांना मिठाईचे बॉक्स वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री.तुपविरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, असा विद्यार्थी- पालक मेळावा एका बस चालकाने आजोजित करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात प्रथमच होत आहे. खरंतर हा मेळावा आयोजित करणे हे शाळेचे कर्तव्य असते. तरी देखील आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याकरता परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील बोलवले असल्यामुळे मी आयोजकांचे विशेष मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाचे आयोजक विजुभाऊ मेहेत्रे ज्यावेळेस विद्यार्थ्यांची शाळेपासून तर त्यांच्या घरापर्यंत प्रवास करत असताना ते अस समजतात की हे सर्व मुल आपलीच आहे. त्यांची ते चढ उतार करताना विशेष काळजी घेतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये जीपीएस ( GPS ) सिस्टीम असल्यामुळे तर आम्हा शिक्षकांना आणि पालकांना देखील याचा खूप उपयोग होतो. गाडी कधीपर्यंत येईल किंवा केव्हा पोहचेल याचा तर्क लावता येतो. या कार्यक्रमाचे संचालन आदिनाथ मोरे व साईनाथ कदम यांनी केले तर आभार विजय मेहेत्रे यांनी मानले.