अहमदनगर

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे साखळी उपोषण

राहुरी – येथील मराठा समाजाच्या शेकडो तरुणांनी एकत्रित येत राहुरी शहरात दुचाकी रॅली काढत तहसील कार्यलयासमोर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.

साखळी उपोषणास सुरुवात करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालून सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मराठा बहुुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी प्रस्ताविक करतांना म्हंटले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा आजपर्यंत अविरत चालू आहे. मराठा आरक्षण लढ्यामध्ये पहिले बलिदान हे कै.अण्णासाहेब पाटील यांनी दिले, त्यांनंतर अ.भा.छावा संघटनेचे कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण जनजागृती करत असतांना आपला देह त्यागला अशा प्रकारे आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त तरुणांनी आरक्षण मिळावे म्हणून आपला देह त्यागला आहे. सरकारने वेळीच मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे असे लांबे म्हणाले.

या प्रसंगी राजेंद्र शेटे म्हणाले की, मराठा आरक्षण लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. वेळीच सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे. या प्रसंगी सत्यवान पवार म्हणाले की, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास त्रास झाल्यास संबंध महाराष्ट्रात उद्रेक होईल. सरकारने तात्काळ निर्णय जाहीर करावा.

या प्रसंगी वंचितचे नेते बाळासाहेब जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेत सदावर्ते यांचा निषेध नोंदविला. अनिल जाधव यांनी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा जाहीर निषेध करत मराठा आरक्षणाला वंचित पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.

या प्रसंगी संतोष चोळके, पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र वाडेकर, सुधीर तनपुरे, ओबीसी नेते अशोक तुपे, निलेश जगधने, गंगाधर काकडे, अर्जुन म्हसे, दिपक मकासरे, सारिकाताई गागरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button