‘भ्रमणसंवादी’ युगात कुठं हरवलाय माणुसकीचा संवाद? – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माणसाने माणसांच्या सुखासाठी यंत्रयुग निर्माण केले आहे, पण आज तोच यंत्र झाला आहे. त्याचा संवाद मुका झाला आहे, या ‘भ्रमणसंवादी’ युगात कुठं हरवलाय माणुसकीचा संवाद? असा प्रश्न रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थित केला.
तळेगाव दिघे येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते बाळासाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बहिःशाल शिक्षण मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे उद्घाटन पहिले प्रबोधन व्याख्यान देताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य प्रा. राजेंद्र पानसरे होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यसेनानी स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन मानवंदना देण्यात आली. बहिःशाल समन्वयक प्रा.शफिक पठाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रामदास आहेर यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. बाबासाहेब लावरे, प्रा.जयश्री भागवत, प्रा. पुष्पा भागवत, प्रा. कविता कोतकर, प्रा. संतोष गुंजाळ, प्रा. स्नेहल शिरसाठ आदीसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी ‘कुठं हरवलाय संवाद’ या विषयावर बोलताना पुढे सांगितले की वन्य किंवा कृषीपूर्व युगात हावभावाची भाषा होती. कृषी युगाची निमिर्ती स्त्रीने केली आणि भटका माणूस स्थिर झाला. माणूस हा बोलणारा प्राणी आहे, त्यामुळेच सर्वक्षेत्रात त्याने प्रगती केली आहे, करीत आहे.
1991 साली खाऊजा धोरण आले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरण, यामुळे माणूस अधिक जवळ आला, पण भ्रमणसंवाद हाती येताच माणूस कुटुंब, समाज, व्यवहार क्षेत्रात संवादविन्मुख होत आहे. हा संवाद वाढला तरच जग तणावमुक्त होईल, जवळ वाटेल, युद्धमुक्त होईल, मतभेद दूर होतील, त्यासाठी वाद नको, संवाद वाढले पाहिजेत. ज्याच्याजवळ संवादकौशल्य असेल तोच जगात यशस्वी ठरेल असे सांगून कविता सादर केली.
उपप्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेब जयकर आणि पुणे विद्यापीठ, थोरात महाविद्यालय यांचे महत्व सांगितले. परस्पर संवाद वाढला तर बरेच प्रश्न सुटतील असे त्यांनी विविध संदर्भातून सांगितले. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांना पुस्तके भेट दिली. कु.तनुजा गुडघे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत सूत्रांचालन केले तर कु. मोहिनी कांदळकर यांनी आभार मानले.