ठळक बातम्या

राहुरीत जालना घटनेच्या निषेधार्थ नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन

राहुरी – अंतरावली सराटी, जि.जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिस प्रशासनाने लाठी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रस्त्यावर मराठा एकीकरण समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण या विषयास धरून महाराष्ट्रात मराठा समाजाची अनेक आंदोलने झाली. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघून देखील पोलिस प्रशासनास कधी काढी घेवून येण्याची गरज पडली नाही. परंतु अंतरावली सराटी, जि.जालना येथे अचानक लाठी हल्ला करण्यात आला. या सर्व घटनेवरून जाणीवपूर्वक मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काही प्रवृत्ती प्रयत्न करत आहेत असे निदर्शनास येत आहे, अशा प्रवृत्तींना ओळखून प्रशासनाने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया लांबे यांनी दिली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले की, अंतरावली सराटी, जि.जालना घटनेची जबाबदारी घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. सत्तेचा गैरवापर करून मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठी हल्ला करणे हि अतिशय निंदनीय बाब आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे.‌ या प्रसंगी रविंद्र मोरे, सचिन म्हसे, मच्छिंद्र गुंड, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आढाव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके आदींनी मनोगत व्यक्त केले.

मराठा एकीकरण समितीने आंदोलना दरम्यान जास्त वेळ रास्ता रोको करून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस न धरता प्रातिनिधिक स्वरुपात १५ मिनिटात रस्ता मोकळा करून दिला व राहुरी शहरातील व्यापारी पेठ बंद न करण्याची भूमिका घेत सामाजिक भान ठेवल्यामुळे सर्व स्तरातून मराठा एकीकरण समितीचे कौतुक केले जात आहे.

यावेळी मराठा एकीकरण समितीचे राजेंद्र लबडे, सतीष घुले, महेंद्र उगले, महेंद्र शेळके, अनिल आढाव, अशोक तनपुरे, रोहित नालकर, प्रशांत खळेकर, अविनाश क्षिरसागर, बलराज पाटील, राजेंद्र खोजे, सुनिल निमसे, ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी निमसे, विनायक बाठे, अनिल चत्तर, ज्ञानेश्वर सप्रे, बापुसाहेब काळे, अनिरुद्ध मोरे, सुनिल तनपुरे, दिनेश वराळे, जयसिंग घाडगे, दत्तात्रय अडसुरे, गणेश वराळे आदींसह मराठा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाचे मागण्यांचे निवेदन तहसिलदार चंद्रजित राजपूत यांनी स्विकारले तर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button