कृषी

पिकांच्या योग्य नियोजनासाठी मृदा सर्वेक्षण महत्वाचे- संचालक डॉ. एन.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : आज आपल्या सर्वांसमोर शेती उत्पन्न वाढ करण्यासाठीच्या प्रयत्नांना धक्का न लावता विकास करणे हे मोठे आव्हान आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी शेतीमधुन जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न, जमिनीतील आवश्यक मुलद्रव्यांची कमतरता व हवामानातील बदल या सर्वांचा परिणाम जमिनीचे आरोग्य खालविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या सर्वांवर मात करुन आपल्याला शेतीमधील शाश्वत उत्पादनाबरोबरच शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे लागणार आहे. जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तसेच पिकांचे योग्य नियोजन करण्यासाठी मृदा सर्वेक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राहुरी चॅप्टर, भारतीय मृदा शास्त्र संस्था, मृदाशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील भारतीय मृदाशास्त्र संस्था, 24 वे डॉ. एन.एस. रंधवा मेमोरीयल व्याख्यान-2023 च्या अंतर्गत मृदा सर्वेक्षण आणि जमीन संसाधन व्यवस्थापनाचे बदलते प्रतिमान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते डॉ. एन.जी. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरविद्या जलसिंचन विभाग प्रमुख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते. याप्रसंगी माजी अधिष्ठाता तथा भारतीय मृदाशास्त्र संस्थेचे फेलो डॉ. बापुसाहेब भाकरे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.एम. कांबळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील पुढे म्हणाले की आय.ओ.टी., कृत्रिम बुध्दीमत्ता, व्हर्टीकल फार्मिंग व सेन्सर्सच्या मदतीने आपण अन्नधान्य उत्पादन वाढीसाठीचा योग्य मार्ग तसेच शेतीमधील विविध प्रश्नांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधु शकतो. डॉ. महानंद माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो या संस्थेबरोबर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सामंजस्य करार केल्यास विद्यापीठाला संशोधनामध्ये फायदा होईल. या संस्थेने केलेले संशोधनाचे काम देश पातळीवर महत्वाचे असून शेतकरी वर्गाला या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी.एम. कांबळे यांनी केले. डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी या कार्यक्रमाची पाश्वर्भुमी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितू ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध विभाग प्रमुख, पुणे, धुळे, कोल्हापूर व हाळगाव येथील मृदाशास्त्रज्ञ, विद्यापीठातील मृदाशास्त्र विभागातील प्राध्यापक, आचार्य व पदव्युत्तर पदविचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button